चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
धारगाव:
भंडारा तालुक्यातील माडगी साझ्यातील कोतवाल भरतीत घोळ झाल्या असल्याचा आरोप करीत या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी,या करीता साझ्यातील परीक्षार्थी यांनी तहसिदार,जिल्हाधिकारी, आमदार व खासदार यांना निवेदन दिले आहे.
भंडारा तालुक्यात १४ साझ्यातील कोतवाल भरती परिक्षा रविवारला घेण्यात आली.लालबहादूर शास्त्री हायस्कूल भंडारा येथे परीक्षा पार पडली.
पेपरची उत्तरतालिका त्याच दिवशी सायंकाळी प्रसिद्ध झाली. माडगी साझ्यातील 24 उमेदवार भरती प्रक्रियेत होते,परीक्षेची प्रश्नपत्रिका कठीण असल्याने बऱ्याच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार 60 च्या पुढेच जावू शकले नाहीत.
तर कधीही अभ्यास न करणारे,कामात व संसारात व्यस्त असणारे,कसलीही जागरुकता नसणारे मात्र नव्वदीपार गुण घेऊन उत्तीर्ण झाले.
२४ पैकी ठराविक ०३ उमेदवारांनाच जास्त गुण दिसल्याने परिक्षार्थ्यांत संशय बळावला व साझ्यातील चावडीवर बसणाऱ्या नागरिकांत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
त्यापैकी एकाला तर १०० पैकी १००, दोघांना प्रत्येकी ९८ टक्के गुण.विशेष म्हणजे परीक्षेच्या वेळेत ह्या उमेदवारांचे अधूनमधून बाहेर जाणेयेणे होते.एक तर चक्क बराच उशिरा आला होता.यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये कोतवाल भरती प्रक्रियेबाबात प्रचंड रोष असून गुण प्राप्त उमेदवारांची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
चौकशी अंती न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उमेदवारांबरोबरच सुजाण ग्रामस्थांनी दिला आहे.
कोतवाल भरती प्रक्रियेत पैशांचा अतोनात महापूर झाला आल्याची चर्चा सर्वत्र आहे.भरतीत घोळ घालून ठराविक ०३ विद्यार्थ्यांनाच जास्त गुण कसे काय? हा प्रश्न पेपर सोडवणारे इतर उमेदवारांना पडला आहे.
स्थानिक पातळीवर जर भरती प्रक्रियेत घोळ होत असेल तर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी काय करावे ? तसेच त्यांचे व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे सायबर क्राईम विभागामार्फत कॉल डिटेल्सची चौकशी करण्यात यावी.हा मुद्दा सुध्दा निवेदनात रेटून धरण्यात आला आहे.
कोतवाल भरती अन्वये त्वरित चौकशी करण्यात यावी या प्रकारचे निवेदन सुनिल बांगाळकर,रिंकेश भोयर,जागेश्वर पाल,प्रशिक वाहणे यांनी दिले आहे.
मनोगत
कोतवाल भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरून कोतवाल भरती प्रक्रियेत भविष्यात घोळ होणार नाही व गरीब,स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या उमेदवारांवर अन्याय होणार नाही.
-सुनिल बांगळकर,उमेदवार