दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : कला क्रीडा सांस्कृतिक अंतर्गत “नाद करायचा नाही” सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर मधील चिमुकल्या मुलांचे आनंदाचे आनंदवन असलेल्या बालोद्यानाचे उद्योगपती अरविंद जैन यांच्या मातोश्रीच्या नावाने म्हणजेच “श्रीमती सोमतोजी जैन बालोद्यान” नामकरणाच्या उद्घाटनाचा समारंभ अरविंद जैन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती शशिकांत बुर्डे, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड, रमेश आढाव, मनीषा गाडेकर,अध्यक्ष सुरेश वडगावकर,सचिव अजित वडगावकर,विश्वस्त प्रकाश काळे,सदस्य अनिल वडगावकर,प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक – विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरविंद जैन यांनी सर्वप्रथम या संस्थेतील बालोद्यानाला आपल्या आईचे नाव दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. विश्वरूपाला आलेली ही श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था पाहून आनंद व्यक्त केला. ही संस्था उभारताना वडगाव परिवाराने कसलाही स्वार्थ न पाहता संस्थेच्या विकासासाठी स्वतःला वाहून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जीवनात वेळ, कष्ट खर्च केल्याशिवाय आपण जीवनात काहीच प्राप्त करू शकत नाही. तसेच मानवी जीवनातील शिक्षण हेच सर्वात मोठे हत्यार आहे जे आपल्याला सर्वोच्च उंचीवर घेऊन जाऊ शकते असे प्रतिपादन केले. व भविष्यात या संस्थेच्या भौतिक सुविधांमध्ये मदत करण्याचे जाहीर केले.
गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांनी लग्नाळू फेम गीत सादर केल्याने सर्व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी बेधुंद होऊन नाचून धमाल केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून आई-वडिलांची आज्ञा पाळणे, आई-वडील हे आपले गुरु मित्र अशा अनेक भूमिकेतून आपल्या सोबत असतात तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये, त्याचा योग्य वापर करावा. विविधतेतून एकता त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरता व पराक्रमाचे वर्णन व राष्ट्र प्रेमाचा संदेश देऊन प्रेक्षकांना भावविभोर करून त्यांची मने जिंकली.यानिमित्ताने सचिव अजित वडगावकर व त्यांच्या पत्नी मंजुश्री वडगावकर यांनी लेझीम नृत्य करून तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी रॅम्पवॉक करून आपला सहभाग नोंदवला.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिराला खास बाब म्हणून मा.शरद पवार साहेबांच्या माध्यमातून अनुदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आळंदी नगरपरिषदेचे तत्कालीन प्रशासन अधिकारी वाळुंज साहेब यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच इंद्रायणी परीक्रमा आणि इंद्रायणी शुद्धीकरणासाठी सतत प्रयत्नशील असणारे गणपत कुऱ्हाडे आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनाही सन्मानित करण्यात आले.