दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आळंदीत २६ ऑक्टोबर पासून महाद्वार चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. यावेळी आळंदीतील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि काल शोले स्टाईल आंदोलन करणारे मराठा युवक श्रीकांत काकडे यांनी ३० ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
यावेळी सदर आमरण उपोषणाबाबत सहाय्यक आयुक्त राजेंद्रसिंह गौर व आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले यावेळी डि.डि.भोसले पाटील, रोहीदास तापकीर, रमेश गोगावले, संतोष तुळशीराम भोसले, मच्छिंद्र शेंडे, अरुण कुरे, निसार सय्यद, बालाजी शिंदे, रमेश तौर, मारुती साळुंके, रामदास साळुंके, विलास कुऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत काकडे म्हणाले की आरक्षणासाठी शांततेत ५७ महामोर्चे काढले. गेल्या दोन महिन्यापासून मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करित आहे. मराठा समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. मराठा समाजातील सर्वसामान्यांचे तरुण आत्महत्या करून आपला जीव गमावू लागले आहेत. दिलेल्या मुदतीत शासनाने मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. गरजवंत मराठ्यांचा हा लढा अराजकिय आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अखेरच्या क्षणांपर्यंत लढत रहाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्राणांची आहुती घायची तयारी असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.