
ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- आरमोरी तालुका मुख्यालयापासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या वडधा गावातील, गावातून जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) अभावी दररोज सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांची रेलचेल वाढतच चालली आहे. अशातच यावर आवर घालणार कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.
गावातील मुख्य मार्गावरून दुचाकी, चारचाकी व इतर अवजड वाहने सुसाट वेगाने पळवित असल्याने दिवसेंदिवस अपघात होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. यावर कुठेतरी आळा घातला जावा; यासाठी मुख्य मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी गावातील सुजाण नागरिकांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील वडधा गाव हे आजूबाजूच्या परिसरातील गावांना लागून मधोमध वसले आहे. गावातून मधोमध एक किलोमिटर अंतरापर्यंत मुख्य डांबरीकरण मार्ग आहे. मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस वस्ती, किराणा दुकान, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने वसलेली आहेत. रस्ता अरुंद आहे.
अशातही अवजड वाहने तसेच इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यात आणखी भर पडून सुसाट वेगाने वाहने जात असल्याने रस्ता ओलांडताना गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वाट शोधावी लागत असते. याच मार्गावर अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात झालेले आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी गावातील ४ वर्षीय श्रवन सुधीर कुर्वे मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.श्रवन रस्त्याच्या कडेला उभा असताना,सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक देऊन जागीच ठार केले होते.
रस्ता अरुंद असल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांवार कुठेतरी लगाम घालण्यासाठी तसेच अपघात होण्याचे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मुख्य मार्गावर गतिरोध आवश्यक आहे.
त्यामुळे ग्राम स्तरावरून वा संबंधित विभागाने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.