भूकंपामुळे कोणतीही हानी नाही,नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

         अमरावती जिल्ह्यात आज दि.३० सप्टेंबर रोजी वेळ दुपारी १.३७ मिनिटांनी चिखलदरा तालुक्यातील टेटू आणि आमझरी भागामध्ये आणि लगतचे काही गाव, तालुक्यामध्ये भूकंपाचा धक्का जाणविल्याची माहिती मिळाली. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

          या संदर्भातील तांत्रिक माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांनी वेबसाईटवर भूकंपाची माहिती प्रकाशित केली आहे. यात 4.2 तिव्रता दर्शविली आहे. यासंदर्भात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य विभाग नागपूर येथील भूवैज्ञानिकांशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्याद्वारे क्षेत्रिय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर भूकंप किंवा हादऱ्याबद्दलची कारणे आणि इतर आवश्यक बाबींची माहिती प्राप्त होणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.