दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभागीय
आळंदी : वारकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या भागवत वारकरी महासंघाच्या वतीने तिर्थक्षेत्र आळंदी येथे एक दिवसीय भागवत वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि.१) रोजी आळंदीजवळील चऱ्होली बुद्रुक येथील मुक्ताई लॉन्समध्ये हे संमेलन होत आहे. या संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद व चर्चासत्र होणार असून, राज्यातील काही मान्यवर कीर्तनकारांचा सन्मान तसेच वारकऱ्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथाचे प्रकाशन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संमेलन होणार आहे.
या संमेलनात दिनकर शास्त्री भुकेले हे अध्यक्षपदी असणार आहेत. माजी आमदार विलास लांडे हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या दुपारच्या सत्रात ‘संत विचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद चर्चासत्र होणार असून, त्याचे अध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर हे आहेत. भुकेले शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली मनुस्मृती आणि भागवत वारकरी संप्रदाय’ या विषयावर परिसंवाद चर्चासत्र होईल. उद्धव महाराज शिंदे यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात होणार असून, दु:शासन क्षीरसागर हे पंचपदी करणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप खासदार अमोल कोल्हे यांचे उपस्थितीत होईल.