प्रतिनिधी : रत्नागिरी.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने दृक-श्राव्य माध्यमांवरील लेखन मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांतर्गत भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणी, दूरदर्शन व विविध समाजमाध्यमांवरील ‘संहिता लेखन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत पुणे येथील पत्रकार व पटकथा लेखक अभिजीत पेंढारकर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सुरुवात उपस्थितांच्या स्वागतने करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना त्यातून उपलब्ध होणाऱ्या नोकरी व व्यवसायाच्या विविध संधी विशद केल्या. अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावीत असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी केले. यानंतर श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय व महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या लेख स्पर्धेतील विजेत्यांना लेख स्पर्धेचे परीक्षक व मुख्य मार्गदर्शक अभिजित पेंढारकर, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले.
या लेख स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून वर्षा काळे, रत्नागिरी यांनी प्रथम, क्षमा प्रभूदेसाई-रेमणे, रत्नागिरी यांनी द्वितीय, शरयू गीते, देवरुख यांनी तृतीय, संतोष जोशी, देवरुख व तन्वी साळवी, देवरुख यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली.
संहिता लेखन कार्यशाळेत महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक यांनी फु बाई फु, अग्निहोत्र, स्वाभिमान यांसारख्या मालिकांचे पटकथा लेखन करणाऱ्या अभिजीत पेंढारकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी एखाद्या विषयावर केले जाणारे संहिता लेखन, प्रत्यक्ष शूटिंगच्या दरम्यान त्यामध्ये करावे लागणारे बदल या प्रक्रियेविषयीची माहिती दिली. तसेच सदर लेखन वा शब्दांकन करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करत त्यांनी संहिता लेखन व सादरीकरण यांचे वस्तूपाठ उपस्थितांसमोर ठेवून त्यांना या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची ओळख करून दिली. हिंदी विभाग प्रमुख स्नेहलता पुजारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. अजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी राजेंद्र राजवाडे, ॲड. समीर आठल्ये, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
कार्यशाळा व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. सीमा कोरे, प्रा. धनंजय दळवी, सद्गुरू लोकमान्य वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदूलकर आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.
फोटो- पारितोषिक प्राप्त स्पर्धकांसह अभिजीत पेंढारकर, प्रा. जी. के. जोशी आणि इतर