युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकर्डा येथील महिलेने न्याय मिळाला नाही म्हणून पतीसह पोलिस स्टेशन समोर दि 29 जुनला आत्मदहन करु असा इशारा दिला होता.मात्र खल्लार पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या पती पत्नीस ताब्यात घेऊन अटक केली व दोघांवर गुन्हे दाखल केलेत.
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकर्डा येथील सौ उमा गजानन कडू वय 40 वर्ष नामक महिलेने झडतीच्या नावाखाली पोलिस कर्मचाऱ्याने विनयभंग केला अशी तक्रार वरिष्ठांकडे फेब्रुवारी महिण्यात केली होती. तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी महिला हि खल्लार पोलिस स्टेशन समोर उपोषणाला बसली होती.
पोलिस खात्याकडून न्याय मिळाला नाही म्हणून गजानन कडू वय 45 वर्ष व त्याची पत्नी सौ उमा कडू यांनी दि 29 जुनला खल्लार पोलिस स्टेशन समोर आत्मदहन करु असा इशारा वरिष्ठांना दिला होता. त्याच अनुषंगाने खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात 29 जुनला खल्लार येथील आठवडी बाजारात सकाळपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमा कडू व गजानन कडू या दाम्पत्यास सलाम पॉईंट येथून ताब्यात घेतले व त्यांच्याकडून ज्वलनशील पेट्रोलच्या बॉटल्या हिसकावून पोलिस स्टेशनला नेऊन दोघाही पती पत्नीवर अप न182/22 ,कलम 309,34नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बॉक्स:-महिलेच्या पतीवर खल्लार ठाण्यात विविध गुन्हे दाखल
उपोषणादरम्यान सौ उमा कडू यांचे पती गजानन कडू यांनी माझ्यावर एकही गुन्हा खल्लार पोलिस स्टेशनमध्ये दाखल नाही असे सांगितले होते. मात्र गजानन कडू यांच्यावर खल्लार पोलिस स्टेशनला पूर्वीचे 324,व अन्य कलमानुसार गुन्हे दाखल आहेत
बॉक्स:-बाहेरून बंदोबस्तासाठी पोलिस मागविले
बुधवार हा खल्लार येथील आठवडी बाजारचा दिवस अन तसेही खल्लार हे बाजार पेठेचे गाव असल्याने येथे नेहमीच नागरिकांची वर्दळ राहते हि बाब लक्षात घेता व कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे घटनेवर लक्ष ठेऊन होते.अनुचित प्रसंग घडू नये म्हणून दर्यापूर व येवदा येथून अतिरिक्त पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले होते