
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
दिनांक ३० मार्च २०२५, पुणे
महागाईने होरपळलेल्या मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबातील भगिनींना लाडकी बहिण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम २१०० रूपये करण्याचे खोटे आश्वासन देवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने राज्यातील ‘स्त्रीशक्ती’चा अपमान केला आहे, असा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.३०) केला.
सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचा आणि लाभार्थी महिलांना मिळणारी मदत वाढवून देता येणार, याची माहिती महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी पक्षाला (अजित पवार) होती. मागील दहा वर्षांपासून राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या कर्जाचा डोंगर आता ७ लाख ८२ हजार ९९१ कोटींवर पोहोचला आहे. असे असतांनाही महायुतीने वाढीव २१०० रूपये देण्याचे खोटे आश्वासन देत भगिनींची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ.चलवादी यांनी केला.
अद्यापही ही रक्कम लाडक्या बहिणींना कधी मिळणार याची शाश्वती नाही. अशाप्रकारेच बहुजनांचा विश्वासघात प्रस्थापित राजकीय पक्ष आतापर्यंत करीत आले आहेत. शोषित, पीडित, उपेक्षित आणि वंचितांच्या भावनेशी खेळत राजकीय फायद्यासाठी त्यांचा आतापर्यंत वापर करण्यात आला आहे.त्यामुळे अशा राजकीय पक्षांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘स्त्रीशक्ती’चा अवमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा,असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले. महायुतीला त्यांच्या राजकीय पराभवाची ‘ओवाळणी’ लाडक्या बहिणी देतील, असा विश्वास डॉ.चलवादींनी व्यक्त केला.
राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईस्तव महिलांना २१०० रुपये मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंरतू, राज्यावर भरमसाठ कर्जाचे डोंगर असल्याने राज्याची स्थिती कधी मजबूत होईल? असा सवाल डॉ.चलवादी यांनी उपस्थित केला. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी वाढीव २१०० रूपये देण्यासाठी आणखी पाच वर्ष लागतील, असे संतापजनक वक्तव्य केले आहे.
गोरगरीब महिलांच्या भावनेशी खेळ करीत सत्ताधारी असंतोषाला जन्म देत आहे.सरकारने स्त्रीशक्तीची दिशाभूल केली आहे.लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन महायुतीने तात्काळ पूर्ण करावे, असे आवाहन डॉ.चलवादींनी यानिमित्ताने केले.