दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : सध्या पर्यावरणाची समस्या गंभीर होत आहे. वादळ, पूर, अवकाळी पाऊस, भूस्खलन, ढगफुटी अशी घटना घडत आहेत. तापमान वाढत आहे. हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करून जनजागृतीसाठी देहू ते आळंदी पर्यावरण जागृती व संकल्प पदयात्रेचे आयोजन रविवारी (ता.३१) पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
देहू व आळंदी ही महाराष्ट्राची दोन बलाढ्य शक्ती आणि ऊर्जा स्थाने आहेत. वारकरी संप्रदायाची आस्था आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार आणि आचारांची संतवाणी लाभली आहे. या संतांच्या साक्षीने व आशीर्वादाने आगामी पिढीला वाचवण्यासाठी व एक स्वच्छ सुंदर पर्यावरण देण्यासाठी देहू ते आळंदी पायी प्रवास करत पर्यावरण लढ्याचा संदेश या पदयात्रेद्वारे दिला जाणार आहे. सध्या वातावरणीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आताच उपाययोजना करण्याचा पदयात्रा हा एक मार्ग आहे. त्याचबरोबर नववर्षासाठी कृती संकल्प आराखडा दिला जाणार आहे. तो सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवायचे कार्य केले जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी…
– एकदा वापरल्या जाणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर न करणे.
– कमी अंतरासाठी पायी किंवा सायकलचा वापर करणे.
– सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे.
– अन्न वाया न घालवणे.
– लिफ्टचा वापर कमी किंवा न करणे.
– प्रत्येकाने कमीत कमी पाच झाड दत्तक घेणे.
– अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे.
– वेस्ट टू. हेल्थ अर्थात कचऱ्यापासून उत्पन्न मिळवणे.
– भूजलाचा नियंत्रित वापर करणे.
– वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या (यूज ॲण्ड थ्रू) वस्तू न वापरणे.
– प्लास्टिक बाटली बंद.
– ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत (कंपोस्ट) बनवणे.
– आठवड्यातून किमान दोन तास सामाजिक कामांसाठी देणे.
– घरे, स्वच्छतागृह, स्नानगृहात कमीत कमी रासायनिक उत्पादने वापरणे.
– घरातील विजेचा वापर जाणीवपूर्वक कमी करणे.
– आठवड्यातून किमान एक दिवस सायकलवर शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाणे.
– वृक्षतोड, कचरा जाळणे, पाणी गळती, प्रदूषण करणाऱ्याला मज्जाव करणे.
– आठवड्यातून एक दिवस न शिजवलेले अन्न खाणे.
– कचरा व्यवस्थापन करण्यापेक्षा कचरा निर्मिती कमी करणे.
– पर्यावरणाचे आपल्यावरील परिणाम, त्यामुळे पडणारा आर्थिकभार याबाबत जागृत राहणे.
– जीवनपद्धती आणि संस्कृती जपण्यासाठी आपले व पर्यावरणाचे सौख्य सामावले आहे.
काय?, कुठे?, कधी?, केव्हा?
काय? – पर्यावरण जागृती व संकल्प पदयात्रा
कुठे? – श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र आळंदी
कधी? – रविवार, ३१ डिसेंबर २०२३
केव्हा? – सकाळी ८ ते दुपारी १२
दृष्टिक्षेपात पदयात्रा
प्रस्थान – देहू येथील देऊळवाड्यात दर्शन घेऊन घाटावरून सकाळी आठ वाजता
समारोप – आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर सकाळी साडेअकरा
अंतर – अंदाजे १५ किलोमीटर, समारोपानंतर संत ज्ञानेश्वर माउली समाधी दर्शन
सूचना – पायी चालता येईल असा पेहराव असावा, सोबत पाण्याची बाटली व कोरडा खाऊ
मार्ग ः देहू, चिखली, इंद्रायणी नदी पूल मोई रस्ता, भारत माता चौक मोशी, डुडुळगाव, आळंदी घाट