रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम:- जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कोरोना आजारामुळे शाळा महाविद्यालय बंद होते. ऑनलाइन शिकवणी वर्गाशिवाय इतर कोणतेही उपक्रम शाळा व महाविद्यालय स्तरावर झाले नाही. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात सर्वच ऑफलाइन सुरू आहे. असे असताना सुद्धा अजून पर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्वरित केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.
प्राथमिक माध्यमिक शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जाते. शैक्षणिक वातावरणासह त्यांच्यातील इतर सूक्त गुणांना वाव मिळावा याकरिता शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येते. कोरोना परिस्थिती लक्षात घेता सदर उपक्रम घेता आले नाही. सध्या जिल्ह्यात कुठेही कोरोनाची स्थिती नाही सर्वत्र नियमित वर्ग सुरू आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धा सहजरित्या पार पाडता येऊ शकत होते. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर केंद्रस्तरीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होतील, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांसह पालकांना होती. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांवर ब्रेक लावण्याचे काम जिल्हा परिषदकडून होत असल्याचा आरोपही भाग्यश्री आश्रम यांनी केला आहे.
शालेय बाल क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते. तो निधी विद्यार्थ्यांवर खर्च न करता इतर विकास कामांवर केले जात असले तरी विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा टक्का नगण्य आहे. तो वाढविण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालकांमध्ये आचार्य व्यक्त केले जात आहे. पालकांची व विद्यार्थ्यांची अपेक्षा लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हा स्तरावरील बाल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या संदर्भात नियोजन करावे, अशीही मागणी सिनेट सदस्य तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.