गडचिरोलीत २८ नोव्हेंबर शिक्षकदिन संपन्न… — महिलांनो तुम्ही बदला, परिवर्तन होणारच :- कविता मडावी…

ऋषी सहारे 

   संपादक

          गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेने फुले दाम्पत्य प्रतिष्ठान, देवापूर एरिया, आदर्शनगर गडचिरोली येथे आयोजित केलेल्या, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर शिक्षक दिन कार्यक्रमात मार्गदर्शक पदावरून त्या बोलत होत्या. 

       “शिक्षकांनी नियोजित अभ्यासक्रमाच्या मर्यादित न राहता सामाजिक भान जपत बदलत्या संदर्भात समाज शिक्षकाच्या भूमिकेत अध्यापन करावे” असे उद्घघाटनीय मनोगत प्रा. संजय लेनगुरे यांनी व्यक्त केले. 

      महात्मा फुले यांच्या विविधांगी कार्याचा आढावा घेताना..

“लोक भावनेचा आदर करून महात्म्यांच्या स्मृतिदिनी शासकीय स्तरावर शिक्षकदिन साजरा करण्यासाठी लोकोत्सवाद्वारे दबाव निर्माण करावा” असे उद्गार प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी केले.

          सावित्रीमाईंच्या विचार व कार्याच्या अनुषंगाने त्यांचे समाजाप्रती विशेषतः महिलांप्रती करुणा व त्याग विशद करताना,”सावित्रीमाईंना अपेक्षित बदल महिलांनी स्वत:मध्ये करावा. परिवर्तन शक्य असुन ते सर्वस्वी महिलांच्या हातात आहे. त्यासाठी महिलांनी तयार व्हावे” असे आवाहन प्रमुख मार्गदर्शिका कविता गेडाम/मडावी सामाजिक कार्यकर्त्या राजुरा यांनी केले. 

         याच कार्यक्रम प्रसंगी केशव गुरनूले सृष्टी फाउंडेशन गडचिरोली यांच्या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाजशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. विजय गुरनूले सिंदेवाही यांनी गायलेल्या महात्मा फुले यांच्यावरील स्फूर्तीदायी गिताने वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव राजेंद्र आदे, सूत्रसंचालन पुरुषोत्तम लेनगुरे व संघटनेचे कोषाध्यक्ष नरेंद्र निकोडे यांनी आभार व्यक्त केले. 

          याप्रसंगी संपूर्ण जिल्हाभरातील व शेजारच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा इ.जिल्ह्यातील विविध जातीधर्माचे समाजबांधव प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.