वर्धा-सेलू विधानसभा मतदारसंघात डॉ.सचिन पावडे यांची अपक्ष उमेदवारी दाखल..

 

      रोहन आदेवार 

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

     वर्धा-सेलू विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि युवा नेते डॉ.सचिन पावडे यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. 

       डॉ.पावडे यांनी पूर्वी काँग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती.त्यांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात चर्चेत होते.मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे,त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

        डॉ.सचिन पावडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या शेकडो समर्थकांनी वर्ध्यातील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे एकत्र येत जाहीर सभा घेतली. 

       या सभेत डॉ.पावडे यांनी देशातील बेरोजगारी,महागाई,शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रचंड आक्रमक भूमिका घेतली.त्यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

      उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक रॅली काढण्यात आली.रॅलीची सुरुवात अनेकांत स्वाध्याय मंदिर वंजारी चौकातून झाली व इंदिरा मार्केट,सोशालिस्ट चौक,बढे चौक,नुरानी चिकन सेंटर,पोस्ट ऑफिस चौक,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा प्रमुख मार्गांवरून परिक्रमण केले गेले.

    वर्धा-सेलू मतदारसंघात आधी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत अपेक्षित होती. मात्र,आता डॉ. सचिन पावडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे ही निवडणूक अधिकच रोचक आणि अनिश्चित झाली आहे.