सतिश कडार्ला,
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा वनविभागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वनजमिनीवरील हजारो मौल्यवान वृक्षांची कत्तल करुन तस्करी केली जात आहे. तसेच गौणखनिजांचे उत्खनन केल्या जात आहे. मात्र यावर अंकुश घालण्यात सिरोंचा वनविभागाला अपयश आल्याने वन्यप्रेमी व पर्यावरणावाद्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत होता. अशातच तालुक्यातील पेंटिपाका जंगल परिसरात अस्वलाचा मृतदेह आढळून आले. यावरुन या भागात आता शिकारीची टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी सर्वस्वी वनप्रशासनाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दोषी वनाधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्याचे साकडे राज्याचे वनमंत्री यांचेकडे घातले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सिरोंचा वनविभागातील जंगल क्षेत्रात वनजमिनीवर अतितक्रमण करणे, मौल्यवान सागवानाची तस्करी करणे, यासाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरु आहे. वनाधिकारी व वनकर्मचा-यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. यामुळे लाखों रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूलही बुडाला आहे. सिरोंचा वनविभागांतर्गत कार्यरत वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून कर्तव्य बजावित नसल्याने वनतस्करांची मुजोरी वाढली आहे. याप्रकरणी संबंधित दोषी वन कर्मचा-यांवर कारवाई करण्यासंदर्भात सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपूरावा करण्यात आला. मात्र सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वृक्षतोडीस वनतस्करीचे प्रकार सुरुच आहेत. अशातच सोमवारी आरडा नियत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पेंटिपाका-पाटीपोचम्मा जंगल रस्त्यालगत अस्वलाचा मृतदेह आढळून आला. यात अस्वलाच्या चारही पायांचे पंज व लिंग गायब असल्याने हा प्रकार शिकारीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे सिरोंचा वनविभागात आता शिकार करणारी टोळीही सक्रिय झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार सर्रास होत असतांना वनसंपदेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले वनविभाग दिवाळीच्या सुट्यात गर्क होते काय? असाही प्रश्न ताटीकोंडावार यांनी केला आहे.
त्यामुळे सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड, गौणखनिजाचे उत्खनन यासह अस्वल शिकार प्रकरणाकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष केंद्रीत करुन संबंधित दोषी वनाधिकारी, वनकर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा नागपूर वनभवनातील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.