दुर्लक्षित भोई समाजाच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील :- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार… सावली येथे वाल्मीक ऋषी पुतळा सौंदर्यकरण,गुणवंतांचा सत्कार, व समाज मेळाव्याचे आयोजन….

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

भोई (ढीवर) समाजाला हजारों वर्षापूर्वी जगप्रसिद्ध रामायण ग्रंथ लिहिणारे त्या काळातील साक्षर असे महान वाल्मीक ऋषी यांचा वारसा लाभला आहे.

           असे असतानाही हा समाज आजवर दुर्लक्षित राहिला आहे. या समाजाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मी मंत्री असताना स्वतंत्र योजनेतून हजारों घरकुले मंजुर करून दिली. अशा प्रचंड मेहनती, एकनिष्ठ व प्रामाणिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार.

          असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथे भोई (ढीवर) समाजाच्या वतीने आयोजित महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळा सौंदर्यकरणाचे भूमिपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळाव्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

          आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, भोई समाज नेते डॉ. दिलीप शिवरकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि. प. सदस्य दिनेश चिटनुरवार, जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, सावली नगरपंचायत उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, सावली काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने, महिला आघाडी अध्यक्ष उषा भोयर, मीनाक्षी गेडाम, छाया शेंडे, पी. जे. सातार ,ज्योती शिंदे, ज्योती गेडाम, दिवाकर भंडारे, आशा बावणे, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, सावली भोई समाज तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, शीला शिंदे, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

         याप्रसंगी भोई समाजाला स्वतःच्या हक्काचे घरकुल देण्यासाठी अथक परिश्रम घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.तर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 

            यानंतर पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाचा खरा आधार भोई समाज बांधव असून या समाजाने अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची वाट धरत समाज प्रगती साधावी. तर या समाजाच्या उत्थानाकरिता महाविकास आघाडीची आगामी काळात सत्ता आल्यास दिवंगत खा.जतिराम बर्वे यांच्या नावे महामंडळ स्थापन करून समाजाच्या मुख्य व्यवसायाचे निगडित असलेल्या सोसायट्यांना अर्थसहाय्य करून भोई समाज बांधवाला मूलभूत हक्क मिळवून देणार.

           मी सर्वसामान्य कुटुंबातून असल्याने मी सामान्यांची वेदना जाणतो. येणाऱ्या काळातही या समाजाला प्रतिनिधित्व देऊन सोबतच उर्वरित सर्व समाज बांधवांना घरकुलांचा लाभ देऊन घरकुल निधीत दुपटीने वाढ करणारा असेही ते यावेळी म्हणाले.

           तत्पूर्वी चंद्रपूर -गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी भोई समाजाच्या आरक्षणातील वाटा, स्पर्धेत टीकायचे असेल तर शिक्षणाचे महत्त्व, आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले.

          तर समाज ऋषींची प्रेरणा घेऊन समाजाने संघटित होऊन उच्चशिक्षित व्हावे व यातून आपला सर्वांगीण विकास साधावा असे आव्हान भोई समाज नेते डॉ. दिलीप शिवरकर यांनी केले.

               यावेळी भोई समाजातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून समाजाच्या व्यथा मांडल्या. आयोजित कार्यक्रमास सावली तालुक्यातील तथा परिसरातील हजारोंच्या संख्येने भोई समाज बांधव उपस्थित होते.