प्रितम जनबंधु
संपादक
गडचिरोली :– शहरातील महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जंतुसंसर्गामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असून, मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे.
रजनी प्रकाश शेडमाके(२३) रा.भानसी, ता.सावली, जि.चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे (२२), रा.मुरखळा चक, ता.चामोर्शी (हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली) अशी मृत महिलांची नावे आहेत.
या दोघींना प्रसूतीसाठी २४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी दोघींचीही शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली. प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु संध्याकाळी रजली शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. दोघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना दोघेही पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
चौकशीसाठी समिती गठीत
दोन महिलांचा मृत्यू जंतुसंसर्गामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कारण जाणून घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. यात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी सांगितले.