मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त :- आमदार कृष्णा गजबे यांचा पाठपुरावा…

ऋषी सहारे 

   संपादक

देसाईगंज:- महायुती शासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील गरीब -गरजु नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महत्वाकांक्षी मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सदर योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले.

          मंजुरी अंती या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले. अनेक लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर काहींचे बांधकाम सुरू आहे. सदर लाभार्थ्यांपैकी अनेकांना पहीला किंवा दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले आहे.

         परंतु अनुदान अप्राप्त असल्याने अनेकांची आर्थिक कोंडी होऊन त्यांना बांधकाम साहित्य, बांधकाम मजुरांची मजुरी देताना प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे व राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोदी आवास घरकुल योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांची व्यथा त्यांचे निदर्शनास आणून देत निवेदनाद्वारे मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने उर्वरित टप्प्यातील अनुदान उपलब्ध करण्याची मागणी केली.

            सदर मागणीच्या अनुषंगाने आज दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने त्यांना वित्त विभागाने उपलब्ध करून दिल्या प्रमाणे संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, यांना ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

         त्यामुळे लवकरच मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यातील अनुदान मिळण्यास मदत होईल. आमदार कृष्णा गजबे यांनी मोदी आवास योजनेच्या घरकूल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार व नामदार अतुलजी सावे यांचे आभार व्यक्त करून उपलब्ध करण्यात आलेला निधी लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता अपुरा असल्याने आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.