युवराज डोंगरे
उपसंपादक/खल्लार
दर्यापूर मतदार संघातील मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात यावे याकरिता ऍड.संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वात उद्या दि 30 ऑगस्टला दर्यापूर येथे भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये मोदी आवास योजने अंतर्गत रखडलेल्या निधींचे लाभार्थ्यांना ताबडतोब धनादेशाचे वाटप करावे,तसेच धनगर व तत्सम जातीच्या जाती-जमातीच्या नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच घरकुलाचा निधी वाढवून देण्यात यावा,तसेच वयश्री योजनेची अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्यात यावे,इत्यादी सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाच्या प्रश्ना संदर्भात दि 30 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजता स्थानिक गांधी चौक येथून हा भव्य आक्रोश मोर्चा निघणार आहे.
स्थानिक उपविभागीय अधिकारी ( महसूल) यांना घरकुल पिडीत जनतेचे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
दर्यापूर मतदार संघातील मोदी आवास योजनेच्या पिडित लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित रहावे व आपली संघटना शक्ती शासनास दाखवावे असे आवाहन सदर “आक्रोश मोर्चा”चे आयोजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड. संतोष कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान घरकुल आवास योजना व मोदी आवास योजना साठीचा कोट्यवधीचा निधी गेल्या अनेक महिन्यापासून दर्यापूर उपविभागात थकल्यामुळे संबंधित लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मागील वर्षीच्या ओबीसी करता सुरू करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेचा निधी शासनाकडे थकीत असल्याचे चित्र संपूर्ण मतदारसंघात आहे.पण,त्या कडे गरिबांचे कैवारी म्हणवणारे तथाकथित पुढारी मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
महाराष्ट्र सरकारकडे लाडक्या बहिणी योजनेच्या केवळ जाहिरातीवर 200 कोटी रुपये खर्च करायला शासनाजवळ पैसा आहे तर एकीकडे गरिबांना राहण्यासाठी घरकुलासाठी निधी उपलब्ध नाही हे या मतदारसंघातील गरीब जनतेची शोकांतिकाच आहे.
दर्यापुर मतदार संघातील शेतकरी सुद्धा मागील खरीप हंगामातंर्गत,अनुदानापासून वंचित असून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
शहरी व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाच्या वतीने रमाई घरकुल योजना,शबरी घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल आवास योजना व मोदी आवास योजना राबविल्या जात आहेत.
सदर योजनेमधून ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थी निवडल्या जातात.वेगवेगळ्या निकषावर घरकुल मंजूर करण्यात येते.सन 2024/ 25 या वर्षात मोठ्या प्रमाणात मोदी आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
त्यानुसार गावातील लाभार्थ्यांना घरकुल मिळाले घरकुल मंजूर झाल्यानंतर निधी उपलब्ध नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत.काहींनी तर निधी अभावी घरकुलाची कामे साहित्य उसनवारी पैशातून आणून बांधकाम केल्याने संबंधित ठेकेदारांचा त्यांना रुपयांसाठी तगादा सुरू आहे व त्यासाठी लाभार्थीत पंचायत समितीच्या चकरा मारून मारून हैराण झाले आहेत.
या सगळ्या बाबी शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी सदर आक्रोश मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे असेही ऍड. संतोष कोल्हे यांनी कळविले आहे.