डोळ्यात मिरची पावडर फेकून वसुली कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, एक फरार…

युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक

          खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील दर्यापूर अंजनगाव रोडवरील ईटकी फाट्याजवळ दि.२१ ऑगस्टला रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास दर्यापूरातील खाजगी फायनान्स कंपनीतील वसुली कर्मचारी कपिल गुडधे(२९) याच्या डोळ्यात तीन अनोळखी इसमानी  मिरची पावडर फेकून त्याच्या जवळील रोख १ लाख ४८ हजार ५३२ रुपये व कंपनीचे साहीत्य असा एकुण १ लाख ५५ हजार ५३२ रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळ काढला होता.

            सदर गुन्ह्याचा तपास हा जिल्हा पोलिस अधिक्षक(ग्रामिण) यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व सूक्ष्म पुराव्याच्या आधारे आरोपी फारुख शहा रऊफ शहा (२४)रा ईस्लाम नगर, मो रेहान मो शरीफ(२९)रा नवगज्जी प्लॉट यांना अंजनगाव येथून ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली.सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र आरोपींना गुन्हे शाखेने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तर या गुन्ह्यातील तिसरा आरोपी सलिम खा नईम खा रा. काठीपूरा अंजनगाव हा फरार आहे.

           दोन्ही आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली  ७० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल, १२ हजार ७०० रुपये रोख, व ११ हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी आरोपींना खल्लार पोलिसांच्या ताब्यात दिले.

             सदरची कारवाई ही जिल्हा पोलिस अधिक्षक(ग्रामिण)विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, अमोल देशमुख, मंगेश लकडे,चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे,सुधिर बावने, सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुलहाने, संजय प्रधान, अक्षय शेळके यांच्या पथकाने केली आहे.