पारशिवनी (ता. प्र.)
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्यात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रवेशद्वारावरच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरिधर धोटे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी वनिता काळे यांचे हस्ते पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आनंद चव्हान, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी प्रिया मेश्राम, शिक्षणप्रेमी कोमल चव्हान,मुख्याध्यापक खुशाल कापसे उपस्थित होते. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत मुलांना गोड जेवण देण्यात आले. दोन वर्षांपासून शाळेला मुकलेले विद्यार्थी नवी पुस्तके, नवा गणवेश, नव्या मित्रांमध्ये रममाण झालेले दिसून आले.