वणी : परशुराम पोटे
उत्तम शेती कनिष्ठ नोकरी असे शिकलेली आपली पिढी आज शेती परवडत नाही या वाक्यापर्यंत येऊन पोहोचली. मशागती पासून काढणीपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात आलेली प्रचंड खर्चिकता आणि परावलंबित्व यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. वास्तविक खऱ्या अर्थाने उत्पन्न देणारा हा व्यवसाय योग्य नियोजनाच्या अभावी विविध संकटांनी ग्रासलेला आहे. मात्र उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य विचार करीत केवळ पिकऊ नाही तर विकू देखील ही भूमिका घेतली तर शेतकरी निश्चितच संपन्न होऊ शकतो असे विचार वणी येथील उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ आणि नगर वाचनालय यांच्याद्वारे आयोजित माझ गाव माझा वक्ता या व्याख्यान शृंखलेत ” शेती आणि शेती पुढील आव्हाने या विषयावर ” दहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघ वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तथा कार्याध्यक्ष माधव सरपटवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माधव सरपटवार यांनी व्याख्यानमालीची भूमिका आणि इतिहास स्पष्ट केला.
नगर वाचनालयाचे सचिव आणि वि.सा.संघाचे उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी शेती आणि माती न विसरलेल्या वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणात पिढी दर पिढी कमी होत जाणारे क्षेत्र, साधनसामग्रीची कमतरता, पतपुरवठ्यातील अडचणी, कमी होत जाणारे पशुधन, शैक्षणिक प्रबोधनाचा अभाव, कृषी केंद्राचा आधारित चालणारी भूमिका, अनावश्यक खते आणि फवारणीचा खर्च, मजुरांची समस्या आणि बाजारपेठेतील अडचणी अशा विविध मुद्द्यांना आणि त्यातील विविध पैलूंना स्पष्ट केले.
केवळ समस्या सांगून वक्ते थांबले नाहीत तर स्वतःच्या जीवनात घेतलेला आंबा लागवडीचा निर्णय किती अडचणींना पार करीत यशस्वी करून दाखविला हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य कृषी पुरस्कार प्राप्त डॉ. दिलीप अलोणे यांनी लोकांच्या जीवनात बदललेल्या मानसिकतेला आणि समाजातून नष्ट झालेल्या श्रम प्रतिष्ठेला पुन:स्थापित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विसा संघाचे सचिव डॉ.अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ.स्वानंद पुंड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले,प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले.