अंधारलेल्या वाटेतील भयावह सत्य…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक

दखल न्युज भारत..

     दहावीचा निकाल लागलाय, अनेकांनी 90% च्या वर मार्क घेतले,चांगली गोष्ट आहे.एक काळ असा होता मेरिट मध्ये मुलगा आला तर जग जिंकल्या सारखा वाटायच.

        पण आज 95 टक्के 98 टक्के सुद्धा सहज झाले आहेत. खरंच एवढी बुद्धिमत्ता वाढली असं वाटतं का हे शोधण्याची गरज आहे.

       असं मला वाटतं 90 टक्के ९५% मुलगा मार्क घेतला की पालकांच्या डोक्यात एकच असतं माझा पाल्य एमबीबीएस किंवा आयआयटीला गेला पाहीजे.पण पालकांनी आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता कुठपर्यंत आहे हे पाहिलं तर आपला मुलगा यशस्वी होऊ शकतो.पण आम्ही हे न पाहता शिकवणी वाले जे स्कॉलरशिप साठी परीक्षा घेतात आणि जवळ जवळ सर्वच मुलांना पन्नास टक्के स्कॉलरशिप मध्ये आणतात,आम्ही परत एकदा हवेत जातो.

        क्लासला प्रवेश घेतो आणि क्लास वाले पण आपल्या पाल्याला त्यांच्या परीक्षांमध्ये शंभरपैकी 85,90,95 गुण देऊन दोन वर्ष आम्हाला खुश करत असतात.आणि आपला पाल्य ही जेंव्हा answer key येते तो ही मला 500 ते 550 मार्क येतील म्हणून दोन महिने खुष करतो.

       पण जेव्हा प्रत्यक्ष नीट किंवा आयआयटीची परीक्षा देऊन दहावीला 95 टक्के घेणाऱ्या पाल्याला शंभर दीडशे गुण भेटतात त्यावेळेस हुशार गुणधर्माची खरी परिस्थिती लक्षात येते.पण आम्ही तिथे सुद्धा थांबत नाही परत दोन-दोन-तीन वर्ष रिपीट करून पाच-सहा लाख टाकून मोकळे होतो.

      मग त्यावेळेस आमच्या पाल्याला कुठलाही रस्ता सापडत नाही.ज्यांना शिक्षण नाही असे पालक चूक करीत असते तर मानू पण उच्च शिक्षित असणाऱ्या पालकांची संख्या त्यामध्ये जास्त असते.याचं दुःख वाटतं ह्यावरून काही विचार करून आपल्या पाल्याची कुवत व आवड ओळखून पुढील मार्ग निवडून आपल्या पाल्यांना स्वतः यशस्वी करावे हीच हे लेख लिहिण्या मागची अपेक्षा लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर माफी असावी.

     पण आज एक भयानक परिस्थिती निर्माण होते आहे आणि त्यात आमच्या पाल्यांचा कोंडमारा होत आहे हे पाहावत नाही म्हणून हे लिहिण्याचे सामर्थ्य दाखवले. 

                    आपला… 

                धनंजय तुमसरे सर

                          साकोली