आचार्य अत्रे पुरस्कार श्रीधर फडके, डॉ.विठ्ठल वाघ आणि मधुकर भावे यांना जाहीर… — शरद पवारांच्या हस्ते १३ जून रोजी सासवड येथे वितरण…

दिनेश कुऱ्हाडे

 उपसंपादक

पुणे : येथील पत्रकार व साहित्यसम्राट आचार्य प्र.के.अत्रे यांच्या नावाने दिले जाणारे मानाचे आचार्य अत्रे साहित्यिक, पत्रकार व कलाकार पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये साहित्यिक पुरस्कार कवी व लेखक डॉ.विठ्ठल वाघ यांना, पत्रकार पुरस्कार मधुकर भावे यांना आणि कलाकार पुरस्कार संगीत क्षेत्रातील श्रीधर फडके यांना जाहीर झाला आहे. 

        पुरंदरमधील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्यावतीने दरवर्षी आचार्य प्र.के.अत्रे यांच्या १३ जून या स्मृतिदिनी ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा अत्रेंचा ५४ वा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे. मंगळवारी (ता. १३ जून) रोजी सकाळी १० वाजता सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. पुरस्काराचे हे ३३ वे वर्ष आहे. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे, विठ्ठलशेठ मणियार, अत्रेंचे नातू अॅड. राजेंद्र पै उपस्थित राहणार आहेत. या वेळी विजय कोलते, मसाप सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे, प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, बंडूकाका जगताप, खाजाभाई बागवान, ॲड. दिलीप निरगुडे, डॉ. राजेश दळवी, शशिकला कोलते, ॲड. कला फडतरे उपस्थित होते.