दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी देवसंस्थान ट्रस्टचे विश्वस्त नियुक्त करणे, हे धर्मादाय उपायुक्त यांचे काम आहे. ही न्याय प्रक्रिया आहे. मेरिटनुसार विश्वस्त नेमणे हे त्यांचे काम आहे. शासन दरबारी आपल्या मागणीचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आंदोलकांना दिले.
श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदावर स्थानिक जेजुरीकर नागरिकांना न्याय न मिळाल्याने गेली चार दिवसांपासून जेजुरीत धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी न्याय मिळावा, यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जेजुरीतील आंदोलकांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टवर पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने 7 पैकी सहा विश्वस्त बाहेरगावचे नियुक्त केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रामस्थांच्या वतीने गेली चार दिवस आंदोलने सुरू आहेत. या पार्श्भूमीवर आंदोलकांनी बारामती येथे जाऊन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली. तसेच मागणी बाबत निवेदन दिले.
यावेळी माजी नगरसेवक जयदीप बारभाई, माजी विश्वस्त संदीप जगताप, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सामाजिक कार्यकर्ते संतोष खोमणे, छबण कुदळे, कृष्णा कुदळे, अनिल वीरकर, सुयोग राऊत, राहुल दोडके, योगेश तुपे आदी उपस्थित होते.