१९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजी नगरमध्ये.. — स्वागताध्यक्षपदी इंजिनियर सतीश चकोर तर मुख्य निमंत्रकपदी अँड.धनंजय बोर्डे यांची निवड.. — प्रा.प्रतिमा परदेशी यांची पत्रकार परिषदेत घोषणा.!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      विद्रोही संस्कृती चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने यंदाचे १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे दिनांक २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. 

       संविधान मुल्यांना समर्पित सत्यशोधक समाज १५१ वर्षपूर्ती आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने संमेलन असणार आहे.

     महात्मा ज्योतिराव फुले यांनी वर्चस्ववादी ग्रंथकार सभेला लिहिलेले पत्र हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा जाहीरनामा आहे.”आमच्या ग्रंथकार सभा आम्ही भरउ,असे म.ज्योतिराव फुले यांनी या पत्रात म्हटले होते.

    वर्चस्ववादी ब्राम्हणी ग्रंथकार सभांना विधायक नकार देत आम्ही आमच्या ग्रंथकार सभा सुरू केल्या आहेत.आमची ग्रंथकार सभा म्हणजे विद्रोही साहित्य संस्कृतीचा महाप्रवाह आहे.विद्रोही सांस्कृतीक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती,साहित्य व विचारांचा पुरस्कार करते.

       विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई कोल्हापूर,औरंगाबाद,अमरावती, सोलापूर,नंदुरबार,वाशी,पुणे,मनमाड,धुळे,परभणी,बुलढाणा,हिंगोली,नाशिक,उदगीर,वर्धा,अमळनेर,इत्यादी ठिकाणी संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.

     साहित्यिक बाबुराव बागुल,वाहरू सोनवणे,डॉ.यशवंत मनोहर,डॉ. अजिज नदाफ,आत्माराम कनीराम राठोड,तारा रेड्डी,तुळशी परब,डॉ.आ.ह.साळुंखे,संजय पवार,जयंत पवार,उर्मिला पवार,श्रीराम गुंदेकर,विमल मोरे,प्रल्हाद लुलेकर,डॉ.प्रतिभा अहिरे,डॉ.आनंद पाटील,गणेश विसपुते,चंद्रकांत वानखेडे,डॉ. वासुदेव मुलाटे यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी भूषवली आहेत. 

      बहुभाषिकता,धार्मिक व सांस्कृतिक बहुविविधतेसह संविधान मूल्यांना समर्पित १९ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन वारकरी संतांच्या मराठवाड्यात,मलिक अंबरच्या शहरात,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानदान नगरात,स्वातंत्र्ययोद्धांच्या समता + वाद्यांच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दिनांक २१,२२ व २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

     अघोषित आणीबाणीला नकार देण्यासाठी,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बहुजनांच्या समता संस्कृतीचा आवाज बुलंद करण्यासाठी संविधान सन्मानासाठी होणाऱ्या या १९ व्या विद्रोही मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी इंजि.सतीश चकोर यांची तर मुख्य निमंत्रकपदी अँड.धनंजय बोर्ड, कार्याध्यक्षपदी खालिद अहमद, तर खजिनदारपदी अँड.के.ई. हरिदास यांची निवड करण्यात आल्याची घोषणा विद्रोही संस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी यांनी संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत केली.

     या प्रसंगी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य पदाधिकारी किशोर ढमाले,चित्रकार राजानंद सुरडकर,साहित्यिक प्रा.भारत शिरसाठ,संविधान प्रबोधक अनंत भवरे,जिजाऊ ब्रिगेडच्या अँड.वैशाली डोळस,शाहीर कॉ. मधुकर खिल्लारे,प्रबोधक सविता अभ्यंकर,डॉ धोंडोपंत मानवतकर,जितेंद्र भवरे, रामदास अभ्यंकर हे उपस्थित होते.

      स्वागताध्यक्षपदी निवड झालेले इंजिनिअर सतीश चकोर हे शासकीय क्लास वन अधिकारी पदाचा राजीनामा देऊन परिवर्तनवादी सामाजिक,सांस्कृतिक कार्यात उडी घेतलेले तरुण उद्योजक आहेत.

   मुख्य निमंत्रक एड.धनंजय बोर्ड हे शैक्षणिक कार्यात सक्रिय असून प्रख्यात फुले आंबेडकरवादी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांचा शैक्षणिक सामजिक वारसा पुढे चालवत आहेत.

     कार्याध्यक्ष खालीद अहमद हे फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे धडाडीचे नेते व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते,विचारशील लघुचित्रपट दिग्दर्शक आहेत. 

      खजिनदार एड.के.ई.हरिदास हे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.या मान्यवरांनी संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजित १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी धुरा खांद्यावर घेतल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.