माऊलींच्या समाधी महोत्सवाची गाथा पुजनाने सुरुवात… — श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने ५ डिसेंबर पासून कार्तिकी यात्रेला सुरुवात… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

    आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ.भावार्थ महाराज देखणे व विश्वस्त योगी निरंजननाथजी यांच्या हस्ते गाथा पूजन आणि विणापूजन करून मंगळवार (दि.२८) सुरूवात करण्यात आली. २८ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर यादरम्यान हा सोहळा होणार आहे.

         आज सकाळी दहा वाजता विणा मंडपात बृम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात विधीवत गाथा पुजन, विणा, पताका, टाळ व पखवाज पुजन विश्वस्तांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा गजर करीत गाथा भजनास सुरवात झाली. यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफाळकर, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, राजाभाऊ चौधरी तसेच आळंदी देवस्थानचे कर्मचारी, वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

          कार्तिक वद्य अष्टमी मंगळवार (दि.५) डिसेंबर रोजी श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने कार्तिकी यात्रेची सुरुवात होणार आहे, शनिवार (दि.९) डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी व सोमवार (दि.११) डिसेंबर रोजी समाधी सोहळा संपन्न होणार आहे, कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने सर्व नियोजित कामे युद्धपातळीवर सुरू आहे असे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.