रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- मागील दोन महिन्यापासून बंद असलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी १ ऑक्टोंबरपासून नियमितपणे सुरू होत आहे. मात्र, ताडोबातील जिप्सी चालकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे.
1ऑक्टोंबरपासून जिप्सी चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील जिप्सीधारकांना १५ वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी.
‘एक कुटूंब एक रोजगार’ हा नियम तत्काळ रद्द करण्यात यावा. चालू व पुढील सत्रापासून जिप्सी नुतनीकरण प्रस्तावाला नाहरकत प्रमाणपत्र जोडले जाणार नाही, बफर/कोर मधील चालकांना आपापल्या कार्यक्षेत्राकरीता सक्ती करण्यात येवू नये,जिप्सीमध्ये चालकाच्या बाजूला केवळ मार्गदर्शकच असावा.
पर्यटकाच्या तक्रारीवरुन जिप्सीचालक व मार्गदर्शकाचे मत घेतल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करु नये.नियमित सुरु असलेल्या बफर, कोर जिप्सीचे नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात यावे.
यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिप्सी चालकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी, वनविभाग उपसंचालक कोर व बफर झोन, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक चिमूर यांना निवेदन देण्यात आले आहे.