सलंगटोला येथून दारु होणार हद्दपार…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलिस स्टेशन हद्दीत सलंगटोला या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी आयोजित ग्रामसभेत कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

         निर्णयाचे उल्लंघन करून दारूविक्री करताना आढळून आल्यास 50 हजारांचा दंडासह शासकीय दाखल्यांपासून वंचित ठेवण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे निश्चितच गावातून अवैध दारूविक्री हद्दपार होणार आहे.

           सलंगटोला या गावात अवैध दारूविक्री सुरु असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. गावातून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनखाली गाव संघटनेकडून प्रयत सुरु आहेत. नुकतीच गावात आयोजित ग्रामसभेत दारूबंदीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

          यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका शारदा मेश्राम यांनी दारूबंदी गाव विकासासाठी काळाची गरज असल्याची बाब ग्रामस्थांना पटवून दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी सुद्धा अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित केला. निर्णयाचे उल्लंघन करून गावात कुणीही दारु विक्री करताना आढळून आल्यास 50 हजारांचा दंड तसेच विक्रेत्यांची माहिती देणार्यास 10 हजारांचा बक्षीस देण्याचे ठरविण्यात आले.

            एवढेस नव्हे तर मुजोर दारूविक्रेत्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे ग्रामसभेत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे गावातील अवैध दारूविक्री बंद होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीमुक्तिपथ-शक्तीपथ महिला समिती व दारबंदी समिती देखील गठीत करण्यात आली.

           मीनाक्षी गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत ग्रामसेविका प्रज्ञाताई फुलझेले, संदीप नैताम, आनंदा कडयामी, कैलास परसो, जितेंद्र तुलावी, लंकेश परसो, भास्कर तुलावी, तुळशीदास तुलावी, रामलाल हिडामी, विश्वनाथ तुलावी, विठोबा उईकें, मनोज तुलावी, रवींद्र हिडामी, माधुरी पोरेटी, विशाखा तुलावी, सुगंधा पोरेटी, उषा कुमरे, इंदू उईंके, शारदा पोरेटी, निवृत्ता तुलावी, सिंधू तुलावी, गीता परसो ,ललिता परसो, हर्षा परसो, मुक्तीपतर्फे तालुका प्रभारी शारदा मेश्राम, जीवन दहीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.