प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – आरमोरी तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाठणवाडा येथे अनेक दिवसापासून कोंबड्यावर ताव मारीत असलेल्या आणि नागरिकांचा जीव गळ्यात अटकलेला असलेला अखेर बिबट्या फास्यात लटकला. वनविभागाने फास्यात लटकलेल्या बिबट्याला पकडून जेरबंद केले.
वैरागड पासून ०२ की. मी. अंतरावर असलेल्या कढोली मार्गावरील पाठणवाडा या गावात अनेक दिवसापासून बिबट्याचे वास्तव्य होते. बिबट्या गावातील नागरिकांच्या कोंबड्यावर ताव मारीत असे. वनविभागाला बिबट्या बाबत माहिती देऊन सुद्धा कोणताही उपाय झाले नसल्याने अखेर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी येथील रहिवासी सिद्धार्थ सहारे यांनी आपल्या घराच्या कुंपणाला फासे लाऊन ठेवले. आज सकाळी या फास्यात बिबट्या लडकला होता. याबाबत वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरी यांना माहिती मिळताच संस्थेचे सचिव दिपक सोनकुसरे यांनी आरमोरी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आरमोरी वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वैरागड वनक्षेत्र अधिकारी सोनुले, वनरक्षक शिवणकर, ताडोबा परिक्षेत्रातील शार्पसुटर आणि त्यांची चमू, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरीचे पदाधिकारी तसेच आरमोरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
फास्यात लटकलेल्या बिबट्याला ताडोबाच्या वन कर्मचाऱ्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या गाडीत त्याला पोलिस सुरक्षेत आरमोरी कार्यालयाकडे नेण्यात आले. फास्यात लटकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी अकाच गर्दी केली होती. नागरिकांना वचक ठेवण्यासाठी वनविभाग आणि पोलिस विभाग यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.