आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलकांची,माजी मुख्यमंत्र्यांसह महत्त्वपूर्ण पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.. — सरपंच,उपसरपंच,ग्रामरोजगार सेवक,संगणक परिचालकांना खात्रीसह दिले आश्वासन!..

          राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

      मुंबईतील आझाद मैदान येथे अखिल भारतीय सरपंच,उपसरपंच,ग्रामरोजगार सेवक व संगणक परिचालकांचे आंदोलन सुरु आहे.”आज या आंदोलन स्थळी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री श्री.शरदचंद्रजी पवार,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे,काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले,अनेक खासदार व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी,भेट दिली. 

     महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व वेगवेगळ्या खेड्यातून आलेले सरपंच बंधू भगिंनी,संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवक लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते… 

       गेले काही दिवसांपासून महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे मागण्या करत आहेत.१६ ऑगस्टला निर्णय घेतला आणि २८ तारखेपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याची भूमिका घेतलीत.१६ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे काम ठप्प आहे. कारण सरपंच,उपसरपंच,संगणक परिचालक,ग्रामरोजगार सेवक यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष नाहीये.

       पण १६ ऑगस्टपासून काम थांबलं आहे याची नोंद राज्य सरकारने घेतली नाही आणि त्यामुळे सर्व अन्यायग्रस्त संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांना,(सरपंच,उपसरपंच,संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांना.) राज्याच्या राजधानीत न्याय मागण्यासाठी यावं लागलं.

  — त्यांच्या मागण्या काय आहेत…

     तर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. 

   ग्रामपंचायत ही प्रशासनाची शेवटची व्यवस्था आहे आणि शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची शक्ती ग्रामपंचायतीत आहे. 

    त्या गावचा मुख्य माणूस गावच्या लोकांच्या मतांवर निवडून आलेला आहे त्यामुळे संबंध गावाची सामूहिक शक्ती ही त्या व्यक्तीच्या-सरपंचाच्या बाजूने उभी आहे.

      त्यामुळे सहाजिकच शेकडो-हजारो लोकांचा प्रतिनिधी म्हणून जो काम करतो तो गावासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याला अधिकार आणि शक्ती सुपूर्द करण्याची गरज आहे. 

      संबंधित अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून काही मागण्या केल्या आहेत.

      आज सगळ्या प्रकारच्या लोकप्रतिनिधींना मानधन मिळतं आणि ज्यावेळेला ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करा असं सरपंच,उपसरपंच,सदस्य म्हणतो त्यामध्ये सरपंच,उपसरपंच व सदस्यांच्या मानधनाचाही विचार करावा लागेल आणि तो पूर्णपणाने योग्य आहे. 

       शेवटी गावातील विकासाची कामं गावच्या सरपंचांना,गावच्या लोकप्रतिनिधींना माहिती असतात. 

     एखाद्या गावचं काम करताना तुम्हाला एक नियम माहिती असेल..

      प्रत्येक गावाच्या लोकांच्या दृष्टीने,गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं काम कोणते आहे, कशाला प्राधान्य दिले पाहिजे हे सरपंचाला माहीत असतं. 

     कारण तो सर्वांच्या वतीने निवडून आलेला असतो.म्हणून त्यांची साधी मागणी आहे. १५ लाखापर्यंत विकासाचं काम करण्याचा अधिकार आणि परवानगी सरपंचाला द्या. ते काही कोटीत किंवा लाखात मागत नाही. 

      सरपंच परिषदेमार्फत फक्त १५ लाखापर्यंतची मागणी करतोय आणि ती करण्याची नितांत आवश्यकता आहे.जे अधिकार पूर्वी होते ते का रद्द केले याची कारणं समजत नाहीत.पण ते अधिकार पुन्हा बहाल करण्यात यावेत. ही सरपंच लोकांची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे. 

*****

     संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीत घ्या.ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ मानधनासाठी घ्या.मागे यावर कमिटी नेमली गेली होती.यावर काही कमिटीच्या शिफारसी आहेत आणि जे सरपंच परिषदेला मान्य आहे,त्याचे स्वीकृती करून त्यांना मान्यता द्या अशी आपल्या लोकांची मागणी आहे.आंदोलन कर्ते काही फार मागायला आला नाहीत. तुम्ही स्वतःसाठी फार थोडं मागायला आलात.

     पण मागायला आलात गावासाठी,गावकऱ्यांसाठी, त्यांच्या भल्यासाठी.म्हणून गावकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याचा जो कोणी आग्रह करतो त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी मजबुतीने राहील एवढंच आश्वस्त करतो. आम्हा सगळ्यांची साथ तुम्हाला राहील.निवडणुका होतील,निवडणुका झाल्यानंतर तुमच्या संघटनेच्या प्रमुखांना माझी सूचना आहे की आपण सर्व एकत्रित येऊन बसा आणि या प्रश्नाची सोडवणूक झाल्याचे समाधान घेऊन जा एवढंच सांगतो. 

     काही वक्ते म्हणाले तसं पेन्शनच्या मागणीलाही आम्हा लोकांची साथ आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या रास्त प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते केलं जाईल या संबंधाने,श.प.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार,उबाठा शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे,काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी खात्री दिली.

     याचबरोबर अनेक खासदार व आमदार महोदयांनी आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन स्थळी भेट दिली व सरपंच,उपसरपंच,संगणक परिचालक,ग्रामरोजगार सेवक,यांच्या मागण्यांकडे जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले.