पुतण्याकडूनच हॉटेल व्यावसायिकाच्या कुटूंबाला जाळून मारण्याचा प्रयत्न… — आरोपीस अटक,खल्लार पोलिसांची कर्तव्यतत्पर कारवाई…

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक 

       खल्लार पोलिस स्टेशन पासून दोन किमी अंतरावर असलेल्या खल्लार फाट्यावरील माऊली स्विट कॉर्नरच्या पंडीत वानखडे व त्यांच्या कुटूंबाला जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा अज्ञात आरोपी हा पंडीत वानखडे यांचा २३ वर्षीय पुतण्याच असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून खल्लार पोलिसांनी आरोपीस अटक केली.

            आरोपी विरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

         खल्लार फाट्यावर पंडीत वानखडे यांचे माऊली स्विट कॉर्नर व विनायक वानखडे यांचे साई हॉटेल आहे.दोघेही सख्खे भाऊ असून दोघेही हॉटेल व्यावसायिक आहेत.पंडीत वानखडे यांचे खाली हॉटेल व वर राहते घर आहे.

           दि.२६ ऑगस्टच्या रात्री पंडीत वानखडे हे पत्नी लिना वानखडे व मुलगा सुमित वानखडे सह झोपले असता अज्ञात इसमाने त्यांचे घर पेट्रोल टाकून जाळले होते.या जाळपोळ घटना क्रमामध्ये पंडीत वानखडे यांच्या घरातील रोख रक्कम,सोन्या चांदीचे दागिने,घरातील सर्वच सामान जाळून बेचिराख झाले होते. 

          पंडीत वानखडे यांचे ५ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.तसेच पत्नी लिना वानखडे व मुलगा सुमित वानखडे जखमी झाले.त्यांचेवर परतवाडा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

         खल्लार परिसरात सर्वांसोबत चांगले संबंध असणारे पंडीत वानखडे यांचे घर जाळल्याने घटनास्थळी काल सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती.घटना मोठी व कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याच्या कामाला खल्लार पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली.

         सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तज्ञांच्या मार्गदर्शनात तपासण्यात आले असता पंडीत वानखडे यांचा पुतण्याच अनिकेत विनायक वानखडे २३ वर्ष रा. गौरखेडा आरोपी असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी अंतर्गत विचारपूस केली.

            चौकशीत त्याने स्वतः पेट्रोल टाकून काकांचे घर जाळल्याचा गुन्हा मान्य केला.त्यावरुन खल्लार पोलिसांनी आरोपी अनिकेत वानखडे याच्या विरुध्द अप न. 203/23,कलम 452,436,307,427,नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली.

             सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे हे करीत आहेत.