संकलनकर्ता
राजेंद्र रामटेके
1)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यात लेक लाडकी योजनेसह महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्षांतील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार.
2) वारीच्या प्रतिदिंडीस 20 हजार रुपयांचा निधी
संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली. मुख्ममंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच, वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना, प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेचस, वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार असल्याचेही घोषित केले.
3)शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचं सहाय्य, वीज बिल माफ
राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
4) मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ
राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसंच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 2 लाख 5 हजार मुलींना होणार असून 2024-25 पासून ही योजना सुरू होत आहे.
5) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेतून पात्र कुटुंबाना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
6) शुभमंगल योजनेचा निधी वाढवला
विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या घोषणेंतर्गत आता 10 हजारांऐवजी 20 हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
7) राज्यातील महिलांसाठी 10 हजार पिंक रिक्षा देण्यात येतील, तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील, अशी घोषणाही अजित पवारांनी केली.
8) यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. तर, गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार…
9) नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार
राज्यात सध्या 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टर्स आहेत. 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्ये मागे 100 हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक,जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, अंबरनाथ येथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहे.
10)मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आला आहे. या योजनेनंतर्गत दरवर्षी 10 लाख तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, दरवर्षी 10 हजार रुपयांचा स्टायफंड या तरुणांना मिळणार आहे.