युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना महाज्योती तर्फे रुपये 50 हजारचे अर्थसाहाय्य!..

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.28: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना 50000 रुपयांचे एक रकमी अर्थ साहाय्य योजने करीता महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. याकरीता उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.

         विद्यार्थी हा दि. 12/06/2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग – पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परिक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था/ सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या उमेदवारांना सदर योजनाच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील, पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत आवश्यक आहे.

          आवश्यक कागदपत्रासह माहाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. नोटीस बोर्डवर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शक तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 जुलै 2023 नमुद करण्यात आलेली आहे. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर 0712-2870120/21 या क्रमांकावर संपर्क साधावा.

          या आधी केंद्रीय लोकसेवा आयोग – पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना 15,000 रुपये देण्याचे प्रावधान होते. ते आता 50,000 रुपये करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांचे आभार मानले आहे. असे प्र.प्रकल्प व्यवस्थापक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी कळविले आहे.