सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधि
तालुक्यातील चकपिरंजी येथे आंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर महीला व बालकांना मिळत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आढळून आल्याने माजी सभापती विजय कोरेवार यांनी पुरवठाधारकावर कारवाईची मागणी केली आहे.
अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता , स्तनदा माता व शून्य ते तीन वर्षांच्या मुलांना डाळ, तांदूळ, मिरची, हळद, तेल, तिखट अशा मिक्स केलेली खिचडी पॅकेटच्या स्वरूपात पोषण आहार शासन पुरवत असते. सदर आहार पुरवण्याचा कंत्राट जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कापसी ता. कामठी जि. नागपूर यांचेकडे आहे. सदर कंपनीने चकपिरंजी क्र. 2 येथे 25 मे ला बॅगमध्ये आहाराचा पुरवठा केला.
आज सकाळी लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी अंगणवाडी सेविका अर्चना इंदोरकर यांनी लाभार्थ्यांसमोर बॅग फोडली असता दुर्गंधी सुटली. त्यात मेलेले उंदीर आढळले व मुंगदाळ अळ्या लागून, भुरशी चढलेले एकूण 156 पाकिटापैकी 40 पाकिटे निकृष्ट दर्जाचे आढळले त्यामुळे लाभार्थी संताप व्यक्त करीत निघून गेले.
याबाबतची माहिती माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना मिळताच घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देत तालुक्यात अनेक अंगणवाडीत अशा प्रकारचा निकृष्ट आहार पुरवठा झालेला असल्याने चौकशी करून कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे.
कोट
अंगणवाडीत पुरवठा होणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. जानेवारी पासून सर्व साहित्य मिश्रित आहार पुरवठा होत असल्याने हे साहित्य लवकर खराब होत असून महिला व मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. असा आहार अधिकारी आपल्या मुलांना खाऊ घालतील का? हा प्रश्न असून पुरवठाधारक कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.