
दखल न्यूज भारत नेटवर्क…
चिमूर : – चंद्रपूर जिल्हातंर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातून दररोज अवैधरित्या रेतीची वाहतूक ट्रॅक्टर,हायवा व ट्रक द्वारे मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
वाळू चोरीचा दैनंदिन उपक्रम बिनधास्त सुरु असताना संबंधित विभागाचे भरारी पथक मुंबईत मंत्रालयाची सुरक्षा करीत आहे काय? असा ज्वलंत प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत…
चिमूर तालुकातंर्गत बिनधास्तपणे सुरू असलेली वाळूची तस्करी सत्ता पक्षाच्या आशिर्वादात किंवा स्थानिक आमदारांच्या आशिर्वादात सुरू आहे काय? हा मुद्दा आता लोक चर्चेत आहे.
पण,चिमूर तालुकातंर्गत कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना अवैध वाळू तस्करीवर नियंत्रण आणता येत नसेल तर त्यांच्या तडकाफडकी बदल्या करणे आवश्यक आहे किंवा त्यांच्यावरच वाळू तस्करीचा गुन्हा चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल करणे गरजेचे झाले आहे.
अवैध व्यवसायांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी चिमूर विधानसभा मतदारसंघात नकोत असेही लोकमन आहे.
अगदी चिमूर तहसील कार्यालयाच्या समोरूनच वाळू तस्करीची वाहतूक सुरु असल्याने अधिकाऱ्यांची वाळू माफियासोबत हातमीळवणी असल्याचा संशय जनतेला आहे.
रेती चोरीच्या वाहतुकी दरम्यान चालक,वाहक तसेच मजुरांनी जिव गमविला असताना अवैध वाळू तस्करी संबंधाने संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने निद्रिस्त रहावे,ही त्यांची कुठली कर्तव्य दक्षता आहे?
चिमूर तालुकातंर्गत रात्रीच्या अंधारात बिनधास्तपणे वाळूचे होत असलेले उत्खनन व त्यातंर्गत सुरू असलेली वाहतूक,याकडे कमालीचे असणारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कशाचे धोतक आहे हे जनतेला कळायला हवे.
रेतीघाट लिलाव न झाल्याने रेती चोरट्यांची सध्याच्या स्थितीत चांदीचचांदी असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे.
चिमूर तालुक्यातील अनेक घाटावर बिनधास्त पणे रेती उत्खनन व वाहतूक सुरू असून चिमूर शहराला लागून असलेली उमा नदी पूर्णतः रेती मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
अवैध वाळू उत्खननामुळे उन्हाच्या तडाख्यात मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागेल किंवा नदी-नाल्यात त्यांना पिण्यासाठी पाणीच नसणार असे वास्तव चित्र समोर येणार आहे.
तद्वतच अवैध वाळू उत्खननामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून शेती करीता पाण्याचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
संबंधित ग्रामपंचायतच्या हद्दीतील रेतीघाटावरुन वाळू उत्खनन करण्याची परवानगी सदर गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या माध्यमातून मंजुरी दिली नसेल तर वाळूचे अवैध उत्खनन रोखण्याचे अधिकार ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थांना आहेत…
आणि वाळू भरलेले ट्रॅक्टर,ट्रक,हायवा,ग्रामस्थांनी अटकवल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळावर येवून स्थळ पंचनामा करुन वाळू चोरट्यांवर कारवाई करीत नसतील तर या संबंधाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आणि वाळू चोरट्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा अधिकार सुध्दा ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आहे.