माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली :- डॉ.हुलगेश चलवादी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

दिनांक २७ डिसेंबर २०२४, पुणे 

           भारताचे माजी पंतप्रधान आणि देशाच्या आर्थिक प्रगतीचे आधारस्तंभ डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाला अपूरणीय हानी झाली आहे. त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व, प्रगतिशील धोरणे, आणि साधेपणाने वागणारा स्वभाव नेहमीच प्रेरणादायी राहतील.

           देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते एक उत्तम व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि सर्व चाहत्यांप्रती माझ्या भावपूर्ण संवेदना, अशा शब्दात बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, देशाच्या आयरन लेडी सुश्री बहन मायावती जी यांनी डॉ.सिंग यांना श्रद्धांजली अर्पित केली.

           बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी डॉ.सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे.

           त्यांनी १९९१ साली अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांनी देशाला जागतिक पातळीवर आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे वंचित, मागासवर्गीय, आणि बहुजन समाजाला देखील नवीन संधी उपलब्ध झाल्या. धोरणात्मक बदल आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाता येते, हॆ त्यांनी दाखवून दिले.

         डॉ.चलवादी यांनी पुढे सांगितले की, “डॉ.सिंग हे केवळ एक नेता नव्हते, तर भारतीय लोकशाहीचे एक आदर्श होते.त्यांच्या नेतृत्वाने भारतातील बहुजन आणि सर्वसामान्य जनतेलाही आर्थिक प्रगतीचा भागीदार होण्याची संधी दिली. त्यांच्या योगदानाची आठवण प्रत्येक भारतीयाला नेहमीच प्रेरित करेल.

            डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मृती भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेच्या इतिहासात अमर राहतील, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली.