तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या वाहतूक कोंडीसाठी स्थानिक ग्रामस्थ एकवटले, वेळ आली तर निवडणूकीवर बहिष्कार टाकू..!

 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

चाकण : तळेगाव -चाकण -शिक्रापूर रस्त्यावर नित्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन झोपलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जागे करण्यासाठी आता स्थानिक गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. वाहतूक कोंडी व रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर जनआंदोलन उभारू व येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

            चाकण औद्योगिक वसाहतीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः स्थानिक ग्रामस्थ मेटाकुटीला आले असताना त्याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच मुद्द्यावर आवाज उठविण्यासाठी दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी हनुमान मंदिर खराबवाडी या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

            या बैठकीला चाकण वाहतूक विभाग व महाळुंगे वाहतूक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत माणिक चौक, चाकण-तळेगाव चौक, मेदनकरवाडी चौक, राणूबाई मळ्यातील सद्गुरुनगर फाटा चौक, आंबेठाण चौक, वाकी भाम चौक, सारा सिटी चौक, वाघजाईनगर चौक, बिरदवडी येथील बाबुराव पवार शाळेसमोरील चौक या ठिकाणच्या वाहतुक नियोजनातील त्रुटी दूर करण्याच्या विनंती स्थानिक ग्रामस्थांनी वाहतूक विभागाला केली. त्याच बरोबर काही ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी दिसून येतं नाहीत त्यावर पण लक्ष देण्याची विनंती ग्रामस्थांनी केली.

               बैठकीत एकूण ६/७ गावाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा लढा आपल्याला एकत्र येऊन लढायचा आहे, जो पर्यंत रस्ता वाहतूक व रस्त्याची निर्मिती होत नाही तो पर्यंत कुणी मागे हटायचे नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला. वेळ आली तर मोठे जन आंदोलन उभारू, राज्याचे नेतृत्व करणारे, केंद्रात नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री यांना भेटू, विनंती करू पण हा प्रश्न मार्गी लावू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. जर एवढं करूनही कुणी आमच्या मागणीची व भावनांची दखल घेत नसेल तर प्रसंगी निवडणूकीवर बहिष्कार टाकू असाही निर्वांनीचा इशारा ग्रामस्थांनी बैठकीत दिला.

            आता वाहतूक कोंडीचा ज्या गावांना त्रास सहन करावा लागतो त्या गावांना भेटी देऊन त्यांच्याकडून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आणि रस्ता सुधारण्यासाठी ठराव गोळा करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. या बैठकीत हजर असणाऱ्या ग्रामस्थांनी इतर गावातील ग्रामस्थांनाही आव्हान केले आहे की, आपणही या चळवळीत सहभागी होऊन हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी उत्सु्फूर्त प्रतिसाद द्यावा. नाहीतर आताच वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच कंपन्या, कार्यालये आपल्या परिसरातून बाहेर चालली आहेत. असेच सुरु राहिले तर भविष्यात पुन्हा आपल्याला डबा घेऊन दुसऱ्याच्या दारात कामाला जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आत्ताच डोळे उघडून स्थानिक नागरिकांनी जागृत व्हावे अन या लढाईत उभे राहावे. हि लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवी त्यासाठी गावभेटी हाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. आणि या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याचे निर्धार आजच्या ग्रामस्थ बैठकीत करण्यात आला. 

             यावेळी बैठकीतून खासदार डॉ. अमोल कोल्हे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

             यावेळी महेंद्र मेदनकर, गणेश नाणेकर, रावसाहेब नाणेकर, हनुमंत देवकर, संतोष खराबी, शशीकांत कड, विष्णू आप्पा कड, सुदर्शन देवकर, मनोज खराबी, जयवंत कड, सुनिल कड, बाप्पा जोगदंड, किरण किर्ते, विलास बिरदवडे, आशिष ढगे पाटील, विश्वनाथ केसवड, सुशील गजशिव, किरण कड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.