अवैध उत्खनन जोमात,अधिकारी-कर्मचारी कोमात… — “दुर्लक्ष करणाऱ्यां अधिकारी महोदयांनी स्पष्ट सांगावे,चोरट्यांचे काय करायचे?”की,झोडपून काढायचे? — त्यांची चौकशी कोण करणार?

 

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

           अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिनदहाडे अवैध उत्खनन करणाऱ्यांकडे बेजबाबदारपणे दुर्लक्ष करण्याची हद्द झाली व अवैध उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी सुध्दा सहन करण्यापलीकडे गेली असल्याचे चिमूर तालुक्यातील सर्वदूरचे चित्र आहे.

          चिमूर तालुक्यातील सर्व गौण खनिज म्हणजे चिमूर तालुक्यातील सर्व नागरिकांची मालमत्ता.या मालमत्तेवर रस्ता मजबूतीकरणाचे कामकरणारे ठेकेदार व इतर चोर बिनधास्तपणे डल्ला मारत असल्यामुळे चिमूर तालुक्यातील नागरिकांचा करोडो रुपयांच्या घरात महसूल बुडविल्या जातो आहे.

        अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे चिमूर तालुक्यातंर्गत जिकडे तिकडे सातत्याने वाळू व मुरुमांचे अवैध उत्खनन सुरू आहे.अवैधपणे उत्खनन करणाऱ्या कंत्राटदार चोरांकडे व इतर चोरांकडे संबंधित अधिकार व कर्मचारी हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट आहे.

          अवैध उत्खनन करणाऱ्या चोरांकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी त्यांच्यात ताकद आता शिल्लक नसल्यामुळे आता संबंधित गावकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील गौण खनिजांचे संरक्षण करण्यासाठी अवैध उत्खनन करणेवाल्या चोरांना झोडपून काढायचे काय?हे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी खुल्लमखुल्ला सांगितलेले बरे राहील.

          गौण खनिजांचे संरक्षण करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना असतांना ते मानसिक गुलाम बनून आपल्या नैतिक जबाबदारीला व कर्तव्याला जागत नसतील तर आपल्या गाव-हद्दीतील अवैध उत्खनन रोखण्याचा संबंधित गावकऱ्यांना अधिकार आहे व समजवून सांगितल्या नंतरही चोर ठेकेदार अवैध उत्खनन मुजोरीने करीत असतील तर संबंधित गावकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील गौण खनिजांचे संरक्षण करण्यासाठी चोर ठेकेदारांना व चोर व्यक्तींना का म्हणून झोडपून काढू नये?हा गंभीर व तितकाच संतापजनक प्रश्न उपस्थित होतो आहे.

             चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या चूप रहो भुमिकांमुळे, एम.के.एस.कंपनी अंतर्गत ठेकेदारांची व इतर चोरट्यांनी एवढी मुजोरी वाढली की ते बिनधास्तपणे मुरुमांचे व वाळूंचे अवैध उत्खनन करीत आहेत.

          आंबेनेरी तलाठी साझातंर्गत मौजा पारडपार मध्ये चिमूर तहसील कार्यालयातंर्गत मुरुम उत्खननाची परवानगी नसताना भुमापण क्रमांक २१६ मधून एम.के.एस.कंपनी कंत्राटदार आज मुरुमाचे उत्खनन करीत आहे.

          मौजा पारडपार परिसरात एम.के.एस.कंपनी द्वारा आज मुरुमांचे उत्खनन सुरू असल्यामुळे सदर ठिकाणच्या मुरुम उत्खननाची माहिती,”मौजा आंबेनेरी तलाठी दडमल दादा व चिमूर तहसील कार्यालयातील संबंधित क्लर्क चौधरी दादा, यांच्याकडून घेतली असता त्यांनी सदर उत्खननाला परवानगी दिली नसल्याचे सांगितले.

         एम.के.एस.कंपनी,चोरीचा मुरुम रस्ता मजबूतीकरणाच्या कामासाठी उपयोगात आणत असेल तर अवैध उत्खननातंर्गत रुपया कुणा-कुणाच्या घशात जातो याची इंत्यभूत चौकशी होणे आवश्यक नाही का?

             अवैध उत्खनन सर्रासपणे होत असताना चिमूर तालुक्यातंर्गत अधिकारी चूप राहात असल्याने त्यांच्या चूप राहणाऱ्या भुमिकांची चौकशी कोण करणार?