जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, आदिवासी बांधवाचा आक्रोश मोर्चा…

प्रितम जनबंधु

संपादक 

गडचिरोली :- खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये गैरआदिवासी धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील २५ आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हजारो आदिवासी बांधवांनी शुक्रवार दी. २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा धडकला.

          गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातून आदिवासींच्या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘आरक्षण आमच्या हक्काचा…, आदिवासी बचाओ, संविधान बचाओ, जय सेवा, भारत माता की जय’ यासह विविध घोषणा मोर्चेकरूंनी दिल्या. विविध घोषणांनी शहरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत होते. 

           जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोर्चेकरूंसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प., जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील विविध रस्ते पोलिसांनी बंद केले होते. कसलाही अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी केवळ नवेगाव टी-पॉइंट ते सोनापूर रस्ता सुरू ठेवला होता. 

             आंदोलनात आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, तसेच काँग्रेसचे नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे, विकास कोडापे, नंदू नरोटे, डॉ. नितिन कोडवते, छगन शेडमाके, माधव गावळ, भरत येरमे, कुणाल कोवे, सैनू गोटा, सदानंद ताराम, दौलत धुर्वे, गंगाधर मडावी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य व आदिवासीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

                  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध घोषणा दिल्या त्यानंतर संयोजक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांच्या नेतृत्वात विविध २६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

              यावेळी समितीचे सचिव भरत येरमे, कार्याध्यक्ष माधवराव गावळ, उपाध्यक्ष प्रशांत मडावी, सहसचिव गुलाबराव मडावी, कोषाध्यक्ष नामदेव उसेंडी, चंद्रकुमार उसेंडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.