देलनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पायउतार….. — मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप…. — अविश्वास ठराव पारित…. लवकरच सत्तापालट होणार…..

प्रितम जनबंधु

   संपादक 

              आरमोरी तालुक्यातील देलनवाडी गट ग्रामपंचायतच्या सरपंच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आरमोरी तहसीलदार यांचेकडे दाखल केला होता. यानुसार २५ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत सरपंच शुभांगी हरिदास मसराम यांच्या विरोधात ७ विरुद्ध २ मतांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

                 त्यामुळे शुभांगी मसराम ह्या सरपंच पदावरून पायउतार झाल्या आहेत. देलनवाडी गट ग्रामपंचायत ९ सदस्यीय आहे. येथील सरपंचपदी शुभांगी मसराम विराजमान होत्या.

            सरपंच मसराम ह्या इतर सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. शिवाय मनमानी कारभार करतात असा आरोप करून अन्य ७ सदस्यांनी १८ सप्टेंबर रोजी आरमोरीच्या तहसीलदारांकडे मसराम यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. 

            आरमोरी तहसीलदार यांनी कागदपत्रांची पडताळणी करून सदर प्रस्ताव स्वीकारला व त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय देलनवाडी येथे सभा घेण्यात आली. या सभेत ७ विरुद्ध २ मतांनी शुभांगी मसराम यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला.

              अविश्वासाच्या बाजूने उपसरपंच त्रिलोक गावतुरे, मनोज अंबादे, चंद्रकला कांबळे, अश्विनी गरमळे, मुनीचंद मडावी, प्रियंका कुमरे, इना मेश्राम आदींनी मतदान केले.           

               देलनवाडी ग्रामपंचायतीमध्ये आता सत्तांतर होणार असून लवकरच पदाधिकारी यांच्या निवडी होतील. देलनवाडी ग्रामपंचायतची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच एखाद्या सरपंचावर अविश्वास पारित करण्यात आला.   

                   यामुळे गावात यापुढे मनमानी करणाऱ्या सरपंचांना या माध्यमातून एक धडा मिळाला. सभा यशस्वी करण्यासाठी दिघेश्वर धाईत, रेमाचंद निकुरे, रोहिदास कुमरे, देवीदास कुमरे, सोमेश्वर मेश्राम आदींनी सहकार्य केले.