छावा संघटनेमार्फत इंद्रायणी नदीत जलसमाधी आंदोलन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : इंद्रायणी नदीमध्ये मैल मिश्रित सांडपाणी सोडून जल प्रदूषण केले जात आहे. याकडे दुर्लक्ष केले जात असून या विरोधात छावा मराठा युवा महासंघाने आंदोलन छेडले आहे. देवाची आळंदी येथे आज इंद्रायणी नदीपात्रात उतरत छावा मराठा युवा महासंघ संघटनेने प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले.

        राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र अशी इंद्रायणी नदी (Indrayani River) वारंवार जल प्रदूषित होत असल्याने छावा संघटनेने राज्यातील भाजप महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी जलसमाधी आंदोलन केले आहे. आषाढी पालखी वारी (Ashadhi Wari) अवघ्या दोन- तीन दिवसांवर आली आहे. असं असताना देखील पवित्र अशी इंद्रायणी नदी वारंवार जल प्रदूषित होत आहे. इंद्रायणी नदी पात्रामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका मैलामिश्रित सांडपाणी सोडत असल्याने तसेच उद्योजक रसायन युक्त पाणी सोडत असल्याने इंद्रायणी नदी वारंवार जल प्रदूषित होत आहे. 

          इंद्रायणी नदी पात्रामध्ये मैला मिश्रीत सांडपाणी तसेच रसायन युक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी पात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलं आहे. राज्यातील भाजप महायुती सरकार नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने इंद्रायणी नदीची अशी दुरावस्था झाली आहे; असे छावा संघटनेचे म्हणणे आहे. राज्यातील भाजप महायुती सरकारने जर इंद्रायणी नदीचे प्रदूषण तात्काळ थांबवलं नाही; तर राज्यातील वारकरी या सरकारला नक्की इंद्रायणी नदी पत्रात जलसमाधी देतील; असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.