आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महाराष्ट्र दिनी साखळी उपोषण…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. इंद्रायणी नदीत कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी, महापालिका, नगरपरीषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील मैलायुक्त पाणी‌ सोडल्याने इंद्रायणी नदीत अतिशय प्रदूषण झाले आहे.हे सर्व रोखण्यासाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १मे महाराष्ट्र दिनी आळंदी येथील माऊली मंदिराजवळ महाद्वार चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

यावेळी विठ्ठलराव शिंदे यांनी सांगितले की इंद्रायणी नदी श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू मधून वाहते. त्यामुळे तिचे वारकरी सांप्रदायिक माहात्म्य अलौकिक होय. या नदीत स्नान करणे म्हणजे मानवी देहाला पवित्र करून घेणे होय, अशी भाविकांची भावना आहे. मात्र, आजमितीस इंद्रायणी नदी फक्त कागदावर पवित्र नदी राहिली आहे. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणाचा विळखा पडला आहे. केवळ नदीच नव्हे, तर काठावर आणि त्या लगतचा परिसर दुर्गंधीने व्यापलेला आहे. त्यामुळे नदीला नदी म्हणायची की नाला हेच समजत नाही. प्रदूषण थांबविण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला. परंतु, अपेक्षित सुधारणा होत नाही. याउलट प्रदूषण समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यामुळे सनदशीर मार्गाने साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 

 

 

इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पदाधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी यांनी नुकतीच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्ती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. अण्णांनी इंद्रायणी संवर्धनबाबत लक्ष घालावे अशी विनंती इंद्रायणी सेवा फौंडेशनी केली. याबाबत अण्णा हजारे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेल, अण्णा हजारे यावेळी म्हणाले की राज्य शासनाच्या विरोधात आवाज उठवायचा असेल; तर लोकशाही मार्गाने जा, असा सल्ला शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिला. यावेळी विठ्ठलराव शिंदे, कोमलताई काळभोर, जनार्दन पितळे, शिरिष कारेकर, ॲड.विलास काटे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संदीप महाराज लोहर, संतोषानंद शास्त्री, संजय महाराज कावळे, डॉ.सुनिल वाघमारे, हर्ष काळभोर आदी उपस्थित होते.