
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी यांनी राज्य योजना वनीकरणाचा भरगच्छ कार्यक्रम आणि जिल्हा निधी सन २०२३–२४ मध्ये मौजा सोनपूरी व किन्ही येथील मिश्र रोपवन लागवड आणि साहित्य खरेदीत केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी याकरिता सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी सहाय्यक वन संरक्षक साकोली यांचेकडे तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही.
त्यानंतर उपवनसंरक्षक भंडारा यांना निवेदन देण्यात आले पण बोगस चौकशी अधिकारी तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी यांनी अर्थकारण करून पुराव्याकडे हेतु पुरस्सर दुर्लक्ष करून चुकीचा अहवाल तयार करून अधिनस्त वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षक यांना वाचविण्याचे प्रयत्न केल्याचे समजताच कैलास गेडाम यांनी नागपूर वनवृत्त नागपूर प्रादेशिकच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांची भेट घेऊन पुराव्यासह ता.१७ मार्च रोजी निवेदन दिले.
त्यांनी तात्काळ दखल घेऊन विभागीय दक्षता वन अधिकारी प्रीतमसिंह कोडापे यांची रोपवनातील गैरप्रकाराचे चौकशी कामी नियुक्ती करण्यात आल्याचे माहिती होताच गैरप्रकार करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनीचे अधिनस्त सहवनक्षेत्र उमरझरी, वनरक्षक बीट चांदोरी येथील किन्ही तथा सहवनक्षेत्र जांभळी/सडक अंतर्गत सोनपुरी येथे आर्थिक वर्ष २०२३–२४ मध्ये राज्य योजना वनीकरणाचा भरगच्छ कार्यक्रम तसेच जिल्हा निधी अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांचे मार्गदर्शनात संबंधित क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षकाचे संनियंत्रण व देखरेखीखाली मिश्र रोपवन लागवड करण्यात आली त्यात अनेक गैरप्रकार व शासकीय निधीचा संबंधितांकडून अपहार करण्यात आला.
अपहार केलेली रक्कम वसूल करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी साकोलीचे तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक आर. पी. राठोड यांचेकडे तक्रार दाखल केली होती पण पाच महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा त्यांनी तक्रारीची दखल न घेता स्थानांतरण्याच्या जागी रुजू झाले.
त्यानंतर २५ जुलै २०२४ ला भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांना निवेदन दिले. त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदक कैलास गेडाम यांचे बयान घेऊन आवश्यक ते पुरावे ही सादर करण्यात आले पण संबंधितांवर कसलीही कारवाई केली गेली नाही. उलट वन परिक्षेत्र अधिकारी, संबंधित क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांना वाचविण्यासाठी चौकशी अधिकारी नसताना प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे यांनी पुरावे नष्ट केले व चुकीचा अहवाल सादर केला.
याप्रकाराने व्यथित होऊन सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांनी नागपूर वनवृत्ताच्या प्रादेशिक वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुराव्यासह निवेदन दिले तथा मिश्र रोपवण लागवड आणि साहित्य खरेदीत केलेल्या गैरप्रकाराचे चौकशीत बोगस पुरावे तयार करणारे वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी, क्षेत्र सहाय्यक व बीटरक्षक यांचेवर निलंबनाची कारवाई करून अफरातफरीची रक्कम वसूल करण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली होती.
प्रादेशिक वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागपूर निर्देशन विभागाचे विभागीय दक्षता वन अधिकारी प्रीतमसिंह कोडापे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र निर्गमित केले आहे.
ही बाब मिश्र रोपवनात अनियमितता व गैरप्रकार करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती होताच त्यांचे धाबे दणाणले आहेत.