
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारकडून आकडे जाहीर होतात. मात्र, प्रत्यक्षात काय काम केले जाते, हा प्रश्न पडतो. नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केवळ मोहीम घोषित करणे पुरेसे नाही. नदी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करायला हवे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी बुधवारी व्यक्त केले.
राम नदी पुनरुज्जीवन मोहिमेला पाच वर्षे झाल्यानिमित्त ‘किर्लोस्कर वसुंधर’तर्फे पत्रकार भवन येथे आयोजित ‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सवा’च्या समारोप सत्रात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि राम नदीचे अभ्यासक डॉ.श्रीनिवास वडगबाळकर यांना डॉ.गाडगीळ यांच्या हस्ते पहिल्या ‘राम नदीसेवक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्या वेळी डॉ.गाडगीळ बोेलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर, किर्लोस्कर वसुंधराचे सहसंचालक आनंद चितळे, संयोजक वीरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते.
‘सन १९५२ च्या दरम्यान मुळा-मुठा नदीच्या पात्रात पोहायला जायचो. मात्र, आता पात्रात पोहण्याची कल्पनासुद्धा करवत नाही. प्रदूषणामुळे मुळा-मुठेची झालेली वाईट अवस्था बघवत नाही,’ अशी खंत व्यक्त करून गाडगीळ म्हणाले, ‘नदीचे प्रदूषण हे केवळ जलप्रदूषण नसते. नदीपात्रातील वनस्पती, प्राणी यांच्या अस्तित्वावरही नद्यांच्या प्रदूषणाचा परिणाम होतो. तेथील जैवविविधता धोक्यात येते. नदीच्या प्रदूषणाचा तिच्या जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.’
‘राम नदीच्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेचा अभ्यास करायला हवा. तेथील नैसर्गिक स्राोतांचा शोध घेऊन त्यांच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. पर्यावरणसंवर्धन, जतन आणि संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असून, ते आपण कर्तव्यभावनेने केले पाहिजे,’ असे मत डॉ. वडगबाळकर यांनी व्यक्त केले. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. अनिल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.