वरील सुंदर भावगर्भित ओळी कानावर पडल्याबरोबर साक्षात संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे सोज्वळ साधेभोळे रुप डोळ्यासमोर उभे राहते.आणि जीवनाचा खरा अर्थ सहज आणि सोप्या भाषेत सांगून जाते.
जन्म दिनी त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.संत तुकाराम यांच्या बद्दल किती ही लिहिले ते कमीच आहे.त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे.नेमका कोणता पैलू निवडावा हाच लिहणारास प्रश्न पडतो.
संत तुकाराम महाराज हे एक महान संत पुरुष होते.ते महान तत्त्ववेत्ता होते.थोर वैचारिक,विज्ञानवादी कवी होते.एवढच नाही तर समाजातील दुष्ट रुढी,परंपरा यावर आपल्या प्रबोधनकारी किर्तनातून समाज जागृती घडवून आणणारे किर्तनकार होते.
त्यांना अक्षर संस्कृती जरी ज्ञात नसली तरी कृषी संस्कृती मात्र त्यांच्या – हदयाच्या प्रत्येक स्पंदनात साठवलेली होती.
जीवनाविषयीचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान ते श्रोत्यांना समजेल अशा सोप्या भाषेतून सांगत असत.सांस्कृतिक जीवनातील उदाहरण,दृष्टांत,रुपके,दाखले,प्रतिके आणि प्रतिमा देवून समाजाच्या गळी उतरवत असत.त्यांचे तत्त्वज्ञान सुखी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान होते.आणि विशेष ते कोणत्याही काळात समाजास तंतोतंत लागू पडणारे आहे.एवढेच नाही तर समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी आपल्या अभंगातून
जागृती घडवून आणली आहे.ते समाजातील प्रत्येकांनाच जीवनातील यश शोधन्यासाठी,जीवनात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर ते आपोआप मिळणार नाही,त्याला करावे लागतील. आणि जेथें कष्ट आहेत तेथे नक्कीच फळ आहे.हे समजून सांगताना एकदम सोप्या भाषेत ते आपल्या अभंगात म्हणतात..
“असाध्य ते साध्य। करुनी अभ्यास। करिती प्रयास। तुका म्हणे।।
ते एखाद्याचे हीत करण्यासाठी त्याची कान उघडणी करतात.त्यांचे दोष ही दाखवतात.चुकांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून कठोर ही बोलतात आणि कृतज्ञता ही बाळगतात.ते म्हणतात….
बोललो ते काही तुमचिया हिता। वचन नेणता क्षमा किजे।
वाट दावी तया न लगे रुसावे। अतित्याई जीवे नाश पावे।
निंब दिला रोगतुटाया अंतरी। पोभाळिता वरि आत चरे।
तुका म्हणे हित देखण्यासि कळे।पडती आंधळे कृपामाजी।..
संत तुकाराम महाराजांना निसर्गावर विलक्षण
प्रेम होते.ते शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जीवन संघर्ष जवळून बघितला. कारण तो जगाचा पोशिंदा आहे. तो आपले कर्तव्य बजावताना तिळमात्रही हलगर्जीपणा करत नाही. कारण त्याला माहित असते कि आपण जर कामात कसूर केला सारे जग उपाशीपोटी राहील.
म्हणून ते म्हणतात,
मढे झाकुनिया करिती पेरणी। कुणबियाचे वाणी लवलाहे।।
शेतकऱ्याच्या घरी एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल,मडे घरी ठेवून पेरणी करणारा महान शेतकरी आहे.एवढा मोठा त्याग तो जगासाठी करत असतो.समाजात चालणारी बुवाबाजी,अंधश्रद्धा,नवस यावरही संत तुकारामांनी प्रहार केला आहे. हा विज्ञान वादी विचार समाजमनावर कोरुन समाजाला सत्याची जाणीव करून दिली आहे.
ते म्हणतात.…
नवसे कन्यापुत्र होती। तरि का करणे लागे पती ।।
एवढेच नाही तर शिक्षणाचे महत्त्व त्यांनी त्याकाळी पटवून दिले आहे.आज महामारीमूळे शिक्षण संकटात सापडले आहे. म्हणून शिक्षणाचा त्रिकोण एकरूप होताना दिसत नाही.
शिक्षण हे ज्ञानदीप आहे.विकासाची पायवाट आहे. पण श्रमाशिवाय फळ नाही. याविषयी संत तुकोबाराय म्हणतात…
अक्षरांचा श्रम केला।फळा आला तेणें तो।।असा मानवतावादी,समतावादी आणि मैत्रीभाव जपणारा संदेश जगाला दिला.सर्व सामान्य मानसासाठी सुखी आणि यशस्वी जीवनाचा मार्ग सांगताना ते म्हणतात,
शुद्ध बिजापोटी। फळे रसाळ गोमटी।।
मुखी अमृताची वाणी। देह वेचावा कारणी।
सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ।
तुका म्हणे जाती। ताप दर्शनी विश्रांती।।
अशा या तत्त्वज्ञानी,गोडवाणी लाभलेले महान संत तुकोबारायांचे किर्तन ऐकण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आवर्जून उपस्थित रहायचे,हे विशेष.
ह्यमूकनायकह्णच्या मुखपृष्ठावर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओळीचा आवर्जून उल्लेख करायचे.
काय करु आतां धरुनिया भीड।
तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निशंक हे तोंड वाजविले।।
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जाण।
सार्थक लाजोन नव्हे हित।।
म्हणून शेवटी आज जन्म दिनी या थोर महात्म्याविषयी एवढेच म्हणावसे वाटते..
” सांगू किती म्हणूनी
माझा तुका केवढा।
स्वयंदीप असे जगी
तुका आभाळा एवढा ।।
**
शब्दांकन
बाबुराव पाईकराव
(डोंगरकवडा)
संपर्क क्र.:-९६६५७११५१४