दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आधार सोशल फाऊंडेशनतर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा अटलशक्ती पुरस्कार २०२४ हा सामाजिक कार्यकर्ते डॉ.राहुल देशमुख यांना देण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होईल.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला उत्कर्ष महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सविता काळोखे, राजेश शिंदे, पुरण हुडके, प्रसाद जोशी, अनिल काळोखे, गणेश येनपुरे, राहुल हांडे, रवींद्र जावळकर, सचिन शुक्ला, नितीन महाबळेश्वरकर, श्याम केवटे, यशोधन आखाडे, संजय चिवलकर, कृष्णा जाधव, मधुकर चरवड, मनिष शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, राजेश पांडे, धीरज घाटे, राजेंद्र काकडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
यंदाचे अटल शक्ती पुरस्कार प्राप्त डॉ.राहुल देशमुख हे नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंजड (एनएडब्ल्यूपीसी, पुणे) या संस्थेच्या माध्यमातून दृष्टीहिनांसाठी कार्यरत असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह असे या मुख्य पुरस्काराचे स्वरुप आहे.
याशिवाय अटल साधना पुरस्कार ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर, प्रसाद खंडागळे, डॉ.चारुदत्तबुवा आफळे, अरविंदनाथ गोस्वामी, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, स्नेहल शिंदे-साखरे, मारुती (आबा) तुपे, परशुराम जोशी यांना देण्यात येणार आहे. मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दिलीप काळोखे म्हणाले, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अतुलनीय होते. देशाच्या विकासासोबतच समाजाच्या प्रत्येक घटकाकरीता त्यांनी कार्य केले आहे.
त्यांच्याप्रमाणे कार्य करणा-या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर अशा व्यक्तींचे कार्य यावे, याकरीता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.