रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम
राजाराम:- अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथे आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी त्यांनी परिसरातील विविध गावात झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गावकऱ्यांची तक्रार येणार नाही असे दर्जेदार काम करा,असे संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्याश्रीताई आत्राम,येथील सरपंच अरुण वेलादी,उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे,राकेश वेलादी,यशवंत डोंगरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,कैलास कोरेत,बालाजी गावडे,सांबय्या करपेत,कनिष्ठ अभियंता रामटेके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
येथील नागरिकांना गावातील एका सार्वजनिक विहिरीतून पिण्यासाठीचे पाणी आणावे लागत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविण्याची आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जलजीवन मिशनच्या माध्यमातून मरपल्ली गावात नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिली.
मरपल्ली गावातील नागरिकांना मुबलक व पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन मधून 66 लाख रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. गावची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या लक्षात घेतल्यास प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरविणे आणि त्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत होती.मात्र, या मिशन मधून प्रत्येकाला पाणी मिळेल याची काळजी घेत ही योजना राबविण्यात येत आहे.
यावेळी आ धर्मराव बाबा आत्राम यांनी कनिष्ठ अभियंता रामटेके यांच्याकडून योजनेच्या कामाची माहिती घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करतानाच पाण्याची टाकी,विहीर तसेच पाईपलाईन चे काम दर्जेदार करण्याचे ताकीद दिले.जेणे करून या योजनेचा गावकऱ्यांना वर्षानुवर्षे लाभ होईल याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.