बहुजनांचे आंदोलन हे सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचेच असायला हवे…

मिलींद वानखडे 

          मुंबई 

    उच्च-नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये बहुजनांचे आंदोलन हे सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचेच असायला हवे.

       परंतु जेव्हा जेव्हा निवडणुका होतात आणि निवडणुकांमध्ये बहुजन विरोधी वर्गाचे पक्ष सत्तेवर आल्याचे बघून बहुजनांना दुःख होते.

       त्यांना या गोष्टीची जाणीव नसावी की,जोपर्यंत सामाजिक व्यवस्था परिवर्तन होत नाही,तोपर्यंत बहुजनांची खरी आणि चिरकाल टिकणारी सत्ता येऊ शकत नाही. 

        आज जे काही तथाकथित बहुजनांचे राजकीय पक्ष आहेत,त्या पक्षात सुद्धा त्यांच्या विरोधकांनी घुसखोरी केलेलीच आहे. 

        त्यामुळे ते पक्ष नाममात्र बहुजनांचे पक्ष आहेत.त्यांच्यापासून बहुजन समाजाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होताना दिसते.

         बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले आहे की,”सामाजिक क्रांती पाठोपाठ नेहमी राजकीय क्रांती येत असते” असे असताना सुद्धा, बहुजन समाजाच्या लोकांचे लक्ष राजकीय सत्तेकडे जास्त,तर सामाजिक व्यवस्था परिवर्तनाकडे मात्र कमी असल्याचे दिसून येते.

          सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यामुळे मागे महाराष्ट्रात मोठा बदल झाल्याचे आपल्याला बघायला मिळते.त्यामुळेच महाराष्ट्र फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जातो.म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारणावर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचे बघायला मिळते.

        महाराष्ट्रातील राजसत्तेत एक सुद्धा बहुजन विरोधक बसू शकत नव्हता आणि आज सुद्धा तथाकथित बहुजनांच्या राजकीय पक्षांची मदत घेतल्याशिवाय विरोधकांना राजसत्ता हाकता येत नाही.त्यामुळेच देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रगल्भ राज्य म्हणून ओळखले जाते.ही किमया केवळ फुले-आंबेडकरांच्या विचारांची किमया होय. 

          त्यामुळे कुठलीही गोष्ट वैचारिक परिवर्तनाची बरोबरी करू शकत नाही.त्यामुळेच महाराष्ट्रातील ही वैचारिक परिवर्तनाची चळवळ आज देशभर फोफावत असून दिवसेंदिवस तिची वाढच होत असल्याचे दिसून येते. 

        परंतु बहुजन समाजातील राजकीय महत्त्वकांक्षी लोकांना देशात आलेल्या या ‘वैचारिक परिवर्तन तुफान’ चे महत्त्व वाटत नसून विरोधकांच्या तुच्छ राजकारणाचे त्यांना भय वाटते.

         आणि ते भय समाजामध्ये पसरवण्याचा ते प्रयत्न करतात.त्यांना या गोष्टीचा विसर पडतो की,देशात दोन विचारांचे युद्ध चालू आहे.एक शेठजी भटजींचा अविचार (विषमता, गुलामी भेदभाव व अन्याय), विरुद्ध बहुजनांचा मानवी कल्याणाचा (समानता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय) विचार. 

         शेठजी भटजी हे आपल्या अविचारांचा प्रसार खुलेआम करू शकत नाहीत.परंतु तो विचार हजारो वर्षापासून रुजलेला असल्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून ते त्याला बळकट करण्याचे कार्य करतात. 

          त्या उलट,बहुजनांच्या विचारांचा देशात आज जरी मोठा प्रसार झालेला असला,तरी तो विचार समाजात रुजायला वेळ लागतो त्याचा फायदा घेऊन विरोधी साम-दाम-दंड-भेद या तंत्राचा वापर करून बहुजनांच्या सामाजिक परिवर्तनाच्या व्यवस्था कार्यात अडथळा आणण्याचे त्यांचे अविरत प्रयत्न चाललेले आहेत.

        अशा परिस्थितीत त्यांचे असत्यावर आधारित असलेले प्रयोग ओळखून त्याचा समाजासमोर पर्दाफाश करून,समाजातील काल्पनिक भीती दूर करून बहुजन समाजाला जागृत केल्याने येथील विषमतेवर,गुलामीवर,भेदभावावर व अन्यायावर आधारित सामाजिक व्यवस्था मुळासकट उखडून फेकण्यास जास्त काळ लागणार नाही.

           देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशावर, व काही अपवाद वगळता,काँग्रेस पक्षाचेच तेही एकाच परिवाराचे राज्य होते.परंतु बहुजन समाजाच्या लोकांनी त्या संदर्भात काही एक विचार केल्याचे दिसत नाही. 

           तसे बघता,काँग्रेस व भाजपच्या राजसत्तेत तसा काही भेद आढळूण येत नाही.कांग्रेस सरकारच्या काळात बहुजनांना विशेषतः अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षणाचा लाभ दिला जात होता आणि बहुजनाच्या विरोधात उघड उघड काही कट कारस्थान केल्या जात नव्हते.

         परंतु बहुजन समाजातील शिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यानी जेंव्हा देशात सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात केली,तेव्हा मात्र काँग्रेसने छुप्या पद्धतीने कायदे निर्माण करून त्यांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. 

        परंतु काँग्रेसचे ते छूपे षडयंत्र बहुजनाच्या लक्षात आले नाही. काँग्रेसनेच देशात खाजाकिरण,उदारीकरण आणि जागतिकीकरण पद्धत लागू करून बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खच्चीकरणाचे प्रयत्न केले.या निर्णयाचा बहुजन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या पद्धतीचा देशभर मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.

        पुढे बहुजन समाजामध्ये जागृती वाढल्यामुळे बहुजनांनी ही प्रतिकार शक्ती दाखवली होती.