प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
समाज हितासाठी पारदर्शक तळमळ असल्याशिवाय उत्तम संघर्ष करता येत नाही व संघर्षाला योग्य दिशा देता येत नाही हे मनोज जरांगे पाटीलांनी मराठा समाजासह महाराष्ट्र व देशातील सर्व समाज घटकातील बांधवांना स्वतःच्या संवेदनशील कर्तृत्वाने दाखवून दिले.
मराठा समाज म्हणजे स्वतःचे कुटूंब आहे आणि या सकल कुटूंबाच्या दिर्घकालीन उन्नतीसाठी व संरक्षणासाठी झटलेच पाहिजे,नव्हे तर सकल मराठा समाजाच्या हितासाठी दिर्घ लढाई लढलीच पाहिजे हा उदांत दृष्टीकोन मनासी बाळगून एक-एक पाऊल पुढे टाकणारे मनोज जरांगे पाटील हे धीरगंभीर असे आत्मविश्वासी नेतृत्व आहेत हे प्रथमतः लक्षात घेतले पाहिजे.
सकल मराठा समाजाच्या,”हितासाठी-उन्नतीसाठी,संघर्ष करण्याच्या उद्देशाने शिक्षण सोडणारे,स्वत:ची शेती विकणारे,मजूरी करणारे व खाजगी नोकरी करणारे मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा आंदोलनाची योग्य दिशा आहे व नेतृत्व गुणातंर्गत न हरणारी स्पष्टता आहे,असे पुढे येते आहे.
धीरगंभीर व आत्मविश्वासी नेतृत्व हे डगमगणारे राहात नाही आणि अस्थिर व विचलित होणारे कमजोर राहात नाही याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली आहे.तद्वतच असे नेतृत्व प्रलोभनाला बळी पडणारे राहत नसल्याने त्यावर अकारण आरोप करणाऱ्यांचीच गच्छंती होते हे सुध्दा सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आहे.
यामुळे जालना जिल्ह्यातील मौजा आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणा नंतर महाराष्ट्र राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पाय सध्यातरी अस्थिर झालेले आहेत,हे सांगण्यासारखं नाही.
सकल मराठा समाजाला आरक्षण द्या! हा मुद्दा मनोज जरांगे पाटीलांचा आत्ताचा नाही तर काही वर्षापूर्वीचा आहे हे लक्षात आल्यावर कळतय की मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी राजकीय लपंडाव व राजकीय कुटनित्या कारणीभूत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असते तर आरक्षणाच्या मुळ गाभाऱ्यात जाऊन कायदेशीर मार्गान्वये मराठा आरक्षण संबंधाने महाराष्ट्र राज्य विधानसभा-विधानपरिषदेत व भारत देशातंर्गत लोकसभा-राज्यसभेत सनद मार्गान्वये मराठा आरक्षण बिल मंजूर करुन वेळीच गंभीरता दाखविण्यात आली असती व जातिनिहाय जनगणना करुन मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात किती आहे याचे वास्तव्य पुढे आणले गेले असते.
मात्र,लोकशाहीच्या सनद मार्गाने मराठा आरक्षण मुद्दा क्रमशः जावू न देता न्यायालयात नेऊन ठेवलाय.मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात न नेता,सकल मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यासाठी सनद मार्गाचा प्रथमतः अवलंब करणे आवश्यक होते व त्यातंर्गत महाराष्ट्र राज्य विधानसभा-विधानपरिषद आणि भारत देशातंर्गत लोकसभा व राज्यसभा येथे मराठा आरक्षण बिल मंजूर करुन घेत कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक होते.
महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांनी मराठी आरक्षणाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया न केल्यामुळे मराठा आरक्षण मुद्दा सर्वोच्च न्यायालयात टिकाव धरु शकला नाही.आता पुढे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण मुद्दा टिकणार की नाही हे सुध्दा गुलदस्त्यातील भाकड कोडे आहे.
***
मनोज जरांगे पाटीलांची भुमिका..
सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता मनोज जरांगे पाटीलांनी,” मराठा आरक्षणासंबंधाने आत्ता आरपारची लढाई लढायची,असा घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे खोटारडे व पळवाट काढणारे,ज्यांना समाजासी काही लेनदेन नाही,स्वार्थी व मतलबी लोकच म्हणू शकतात.
मराठा समाजाचे सर्वोच्च हित गाठण्यासाठी लढण्यात येणारी सनद व कायदेशीर लढाई आता योग्य दिशाकडे वळली आहे.याचबरोबर सत्ताधाऱ्यांना जाग्यावर आणणारी ठरली आहे.सत्ता येईल आणि जाईल,”पण,त्याहीपेक्षा समाज हित महत्वाचे आहे,हे मनोज जरांगे पाटीलांकडून शिकले पाहिजे.
मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजाच्या हितासाठी पोटतिडकीने धडपडतात,तडमळतात,हे त्यांच्यातील समाजाप्रती असलेले हृदयस्पर्शी कर्तव्य होय हे सत्ताधाऱ्यांना लवकर कळले तर बरे होईल…
मनोज जरांगे पाटील ना सत्तेचे भुकेले,ना धनदौलतीचे भुकेले,यामुळे त्यांचा व त्यांच्या समाजाचा पराभव करणे महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना शक्य नाही असे चिन्हे आता दिसू लागली आहेत.
***
महाराष्ट्रच्या सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही…
आंतरवली सराटी येथील आमरण उपोषणा दरम्यान त्यांच्यावर व गावातील नागरिकांवर,महिलांवर नोंद करण्यात आलेले अयोग्य गुन्हे ४५ दिवसानंतरही महाराष्ट्र शासनाला मागे घेता आले नाहीत,”तर, त्यांच्यावर विश्वास दाखवायचा कसा ?हा मनोज जरांगे पाटीलांचा मुद्दा अतिशय मार्मिक व तितकाच मन हेलावणारा आहे.
महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी हे मराठा समाजाच्या भावनांसी खेळतात असे मनोज जरांगे पाटीलांना एकप्रकारे खरे वाटू लागले असेल तर यात त्यांचा काय दोष?
***
सहकार्य
स्व समाजाच्या हितासाठी मराठा समाज सर्वोतोपरी मदत करीत असेल व संघर्ष करायला पुढे येत असेल तर बाकीच्यांना,त्यांच्या मदतीवर आणि एकजूटीवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही.
***
आडवेतिडवे बोलण्यापेक्षा…
मराठा समाज सुध्दा या देशातील अंग आहे,मुळ रहिवासी आहे,या अंगाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न व सहकार्य करणे गरजेचे आहे.
आता पर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिल्याने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही असे मनोज जरांगे पाटीलांचे सुचक बोल,सत्ताधाऱ्यांना कृती करायला भाग पाडतात,यात मनोज जरांगे पाटीलांची भुमिका चुकीची आहे असे म्हणता येत नाही.
तसेही गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की महाराष्ट्र राज्याची सत्ता आमच्या हातात द्या,सहा महिन्यात सर्व समाजाला आरक्षण देतोय.कुठे गेलेत त्यांचे आश्वासन?
यावर सत्ताधारी बोलतील काय?