नीरा नरसिंहपुर दिनांक 25 प्रतिनिधी
बाळासाहेब सुतार,
नरसिंहपुर ते बावडा परिसर तालुका इंदापूर येथे भाद्रपद मासातील सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी, कोरोना काळानंतर पहिल्यांदाच नाचत वाजत गाजत सर्जा राजाचा बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला,
बैल, गाय, म्हैस व शेळ्यांना रंगवून त्यांना मिष्ठान्न खायाला घालून त्यांची पुजा करुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागात यांत्रिकीकरणाच्या जमान्यात आजही परंपरा पाळली जात आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीपासून परिसरात जोरदार धडक मारल्याने शेतकरी राजा खुश आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात जोमदार पाऊस पडला. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून गाई, म्हैस, शेळ्या व बैलांंना संबोधले जाते. त्यांच्या वर्षभराच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. परंतू काही भागात लंपी संसर्गामुळे बैलपोळा सणावर संकट असतानाही बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.नरसिंहपूर परीसरात पिंपरी बुद्रुक येथील प्रगतशील बागायतदार नबीलाल शहाबुद्दीन शेख, अश्रफ व शियान शेख यांनी आपल्या सर्जा राजाला भिमा नदीच्या पाण्याने धुवून त्यांना शिंगांना हिंगूळाचा रंग लावला. तर लाल रंगाने संपूर्ण शरीर सजवून घेतले. त्यानंतर त्यांच्या शिंगात शिंबी घालून अंगावर रंगीबेरंगी झूल घालण्यात आली. त्यानंतर त्यांना कुडबूळ, पुरण पोळीचा मिष्ठान्न नैवेद्य दाखवून त्यांना ओवळण्यात आले. तर संपूर्ण कुटुंबीयांनी बैल जोडीच्या पायाला हात लावून दर्शन घेत अशीच सेवा पुढेही रहावी असे आवाहन त्यांनी केले.
नरसिंहपूर परीसरातील टणू, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, गणेशवाडी, लुमेवाडी, सराटी आदि गावात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी मानाच्या बैलांची व ग्रामस्थांच्या बैलांची मिरवणूक डिजे, लेझीम, हलग्यांच्या निनादात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. बैलपोळा सणानिमित्त सर्वाच्या घरी पुरण पोळीचा मिष्ठान्न जेवणाचीही सोय करून पाहुणे जेवायला घातले.